सोमवारी राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसला गृहमंत्रिपद देऊ नये असा सल्ला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला गृहमंत्रिपद दिल्यास मातोश्रीवरही कॅमेरे लागतील, असंही ते म्हणाले.

अर्थखातं, महसूल खातं, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आता गृहमंत्रिपदही दिलं तर तुमच्याकडे काय केवळ मुख्यमंत्रिपद ठेवणार का ? असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही एकत्र काम केलं आहे. त्यामुळे शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसला गृहमंत्रिपद देऊ नये असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

ठाकरेंचा यु-टर्न
सरकारने शेतकऱ्यांना दिलेली दोन लाखांची कर्जमाफी स्वागतार्ह आहे. मात्र ही शुद्ध फसवणूक आहे अशी टीका पाटील यांनी केली होती. “सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेली दोन लाखाची कर्जमाफी ही फसवणूक आहे. उद्धव ठाकरे यांनी जो शब्द दिला होता तो पाळला नाही. त्यांनी दिलेल्या शब्दावरुन यु-टर्न मारला आहे,” असं ते म्हणाले होते.

“प्रत्येक गोष्टीत ते यु-टर्न मारतात. सत्तेत आल्यानंतर मर्यादा असतील असं मान्य आहे. मात्र त्यांनी सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. सरकारने दोन लाखाची कर्जमाफी केली आहे. पण २००१ ते २०१६ या कालावधीतील दोन लाखापर्यंतचं कर्ज असलेला शेतकरीच कर्जमाफी देण्यासाठी राहिलेला नाही. आता फक्त दोन लाखावरचे शेतकरी राहिले आहेत आणि यांना कर्जमाफी दिली जाणार नाही आहे. त्यामुळे ही कर्जमाफी म्हणजे फसवणूक आहे,” असंही त्यांनी नमूद केलं होतं.