राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा एक फोटो ट्वीट केल्यामुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे. या फोटोवरून आव्हाडांनी बावनकुळेंना लक्ष्य केलं आहे. याआधीही चंद्रशेखर बावनकुळेंनी औरंगजेबाचा उल्लेख ‘औरंगजेबजी’ असा केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. आता आव्हाडांच्या ट्वीटमुळे नवी चर्चा सुरू झालेली असतानाच त्यावर आता खुद्द चंद्रशेखर बावनकुळेंनीच स्पष्टीकरण दिलं आहे. वसईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काय आहे आव्हाडांच्या ट्वीटमध्ये?

जितेंद्र आव्हाडांनी काल मध्यरात्री चंद्रशेखर बावनकुळेंचा एक फोटो ट्वीट केला आहे. “औरंगजेबजीच्या कबरीवर फुले वाहताना बावनकुळेजी”, असं खोचक ट्वीट आव्हाडांनी या फोटोसोबत केलं आहे. या फोटोमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि इतर नेते व मुस्लीम धर्मगुरू दिसत आहेत.

“इतका नीचपणा?”

दरम्यान, या फोटोवरून वाद निर्माण होत असताना त्यावर बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच, यावेळी त्यांनी जितेंद्र आव्हाडांवर आगपाखडही केली आहे. “आज जितेंद्र आव्हाडांनी औरंगजेबजी यांच्या कबरीवर मी जाऊन दर्शन घेतलं अशी एक पोस्ट केली. जे. पी. नड्डा, मी चंद्रपूरमध्ये पवित्र दर्ग्यावर गेलो. तिथल्या मुस्लीम परिवारांनीही आमच्यासह दर्शन घेतलं. त्यावर जितेंद्र आव्हाडांनी काय ट्वीट केलं? ते भूगोल विसरलेत का? ते म्हणतात औरंगजेबाच्या थडग्याचं दर्शन घेतलं. इतका नीचपणा?” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

चंद्रशेखर बावनकुळेंचा ‘तो’ फोटो शेअर करत जितेंद्र आव्हाडांचं खोचक ट्वीट; म्हणाले, “औरंगजेबजीच्या कबरीवर…”

“आम्ही धर्माविरुद्ध असतो, तर…”

“पवित्र दर्ग्याचं दर्शन घेतानाची तुलना तुम्ही औरंगजेबाच्या कबरीशी केली आहे. आम्ही धर्माच्या विरुद्ध असतो, तर अटल बिहारी वाजपेयींच्या काळात अब्दुल कलामांना राष्ट्रपती केलं नसतं. धर्म पवित्रच असतो. आमचा विरोध दहशतवादी विचारसरणीला आहे. तुम्ही मुस्लीम समाजाचा, त्या भावनांचा अनादर केला आहे”, असंही बावनकुळे यावेळी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘औरंगजेबजी’ उल्लेखावरही बावनकुळेंचं स्पष्टीकरण

दरम्यान, यावेळी बोलताना बावनकुळेंनी ‘औरंगजेबजी’ या उल्लेखावरही स्पष्टीकरण दिलं. “माझं पूर्ण भाषण ऐकलं, तर तुम्हाला समजेल. मराठीत पत्रकार परिषद सुरू असताना हिंदीत एक प्रश्न आला. त्यांनी विचारलं की राधे राधे म्हणणाऱ्यावर तात्काळ कारवाई करा असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं. मग जितेंद्र आव्हाडांच्या मनात जो औरंगजेबजी आहे, तो मी मांडला. मी रोज पत्रकार परिषदेत म्हणतोय हे. जितेंद्र आव्हाडांच्या मनात जे आहे ते मी सांगितलं. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला. आम्ही कधीही आमचा जीव गेला तरी औरंगजेबाचा कधीही आदर करू शकत नाही. तो क्रूरकर्माच आहे. तो या महाराष्ट्राचा द्रोही आहे. तो देशद्रोही आहे. आम्ही औरंगजेबाचा कधीच पुरस्कार करू शकत नाही”, असंही बावनकुळे म्हणाले.