राज्यात एकीकडे महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यात कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत असताना दुसरीकडे चित्रा वाघ आणि विद्या चव्हाण यांच्यात देखील आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना बलात्कार पीडितेला घरी ठेऊन घेऊन भाजपा आमदारांकडून वसूली करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केल्याचं माध्यम प्रतिनिधींनी विचारताच पत्रकार परिषदेतच चित्रा वाघ भडकल्या आणि त्यांनी थेट विद्या चव्हाण यांना आव्हानच दिलं.

“त्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याची शक्यता…”

विद्या चव्हाण यांच्या आरोपांविषयी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, “विद्याताईंच्या या वक्तव्याचा मी निषेध करते. त्यांनी हे सिद्ध करावं. जर मी हे असं केलं असेल, तर त्या दिवशी मी राजकारणातून निवृत्ती घेईन. ती केस राज्याचे आत्ताचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, शरद पवार या सगळ्यांना माहिती होती. आम्ही त्या मुलीला मदत करत होतो. हे कदाचित विद्या चव्हाण यांना माहिती नसेल. त्यांच्या कुटुंबातील वादामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. हे उठसूट फालतू आरोप सुरू आहेत. मलाही खूप बोलता येतं”.

“मी कुणालाही शुर्पणखा म्हटलेलं नाही, पण…”, चित्रा वाघ यांचा रुपाली चाकणकरांना अप्रत्यक्ष टोला!

“नाही त्या आमदाराचं थोबाड फोडलं तर….”

“माझ्या वैयक्तिक आयुष्यावर तुम्ही टीका करता, ते मी खपवून घेते. पण माझ्या कामाविषयी बोललात तर ते मी सहन करणार नाही. आजही ती मुलगी माझ्या संपर्कात आहे. विद्या चव्हाणांनी हे आता सिद्ध करून दाखवावं. मला आता अजित पवार, सुनील तटकरे आणि शरद पवार साहेबांनाही सांगायचं आहे, की कृपा करून विद्या चव्हाणांना बोलवून घ्या आणि या प्रकरणाविषयी आपण कसं काम केलं हे त्यांना सांगावं. कोण गेलं, कुणी खंडणी मागितली, कोणता आमदार घेऊन या माझ्यासमोर. नाही त्याचं थोबाड फोडलं तर चित्रा वाघ नाव सांगणार नाही. त्या मुलीला मदत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं ठरवलेल्या धोरणावर चित्रा वाघ काम करत होती. त्यामुळे विद्या चव्हाणांचे आरोप सहन केले जाणार नाहीत”, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी विद्या चव्हाण यांच्यावर टीका केली आहे.

विद्या चव्हाण म्हणाल्या….

“चित्रा वाघ यांचे ब्लॅकमेलिंगचे प्रकार सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना एका मुलीवर अत्याचार केल्याचे आरोप त्यांनी भाजपा आमदारावर केले होते. त्यांनी तिला स्वत:कडे आणून ठेवलं होतं. मी तुला न्याय मिळवून देईन, असं त्यांनी सांगितलं होतं. आजपर्यंत पदं मिळवणे, पक्षात एखादी जागा मिळवणं यासाठी हे हातखंडे त्यांनी अनेक वर्षांपासून आत्मसात केले आहेत”, असे आरोप विद्या चव्हाण यांनी केले आहेत.