काँग्रेस-राष्ट्रवादीत माघारनाटय़ रंगले; नागपूरमध्ये भाजपचे गिरीश व्यास बिनविरोध

मनसेने तटस्थ राहण्याचा निर्णय जाहीर केल्याने विधान परिषदेच्या मुंबई प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीत भाजपने माघार घेतली व त्यातून काँग्रेसचा मार्ग मोकळा झाला. मुंबई आणि नगरमध्ये परस्परांचा बंडखोर िरगणात राहिल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीत माघारनाटय़ रंगले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये मात्र भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला.
मुंबईतील दुसऱ्या जागेकरिता चुरस होती. भाजपने सारी शक्ती पणाला लावली होती. पण मनसेच्या २८ मतांवर भाजपचे भवितव्य अवलंबून होते. मनसेने तटस्थ राहण्याचे जाहीर केल्याने भाजपची पंचाईत झाली आणि मनोज कोटक यांनी माघार घेतली. शिवसेनेचे रामदास कदम, काँग्रेसचे भाई जगताप आणि राष्ट्रवादीचे बंडखोर प्रसाद लाड हे रिंगणात आहेत. लाड यांना भाजपने मदत केली तरी मतांचे गणित जुळणे कठीण आहे. मनसेच्या नकारामुळे भाजप नेत्यांचा उत्साह मावळला. रामदास कदम यांना पहिल्या पसंतीची ७६ मते मिळण्यात काहीच अडचण येणार नाही. दुसऱ्या जागेकरिता जास्त मते मिळवील तो विजयी होईल. सध्या तरी काँग्रेसचे भाई जगताप यांना विजयाची संधी आहे.
नागपूरमध्ये काँग्रेसच्या माघारीमुळे भाजपचे गिरीश व्यास यांची बिनविरोध निवड झाली. नागपूरचा गड सर केल्याने मुख्यमंत्र्यांना तेवढाच दिलासा मिळाला आहे.
नगरमध्ये काँग्रेसचे बंडखोर जयंत ससाणे यांनी माघार न घेतल्याने तिरंगी लढत होणार आहे. मुंबईत राष्ट्रवादीच्या बंडखोराने माघार न घेतल्यानेच नगरमध्ये काँग्रेसने आपला उमेदवार रिंगणात ठेवला. मुंबईबाबत सकारात्मक चर्चा झाली तरच नगरमध्ये माघार घेण्याची काँग्रेसची तयारी आहे. येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. सोलापूरमध्ये काँग्रेसच्या बंडखोराने माघार घेतली.