आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांसाठी २५ आणि २६ सप्टेंबरला लेखी परीक्षा घेतली जाणार होती. मात्र ही परीक्षा अचानकपणे पुढे ढकलण्यात आल्याने व परीक्षेच्या आदल्यादिवशी रात्री याबाबत निर्णय जाहीर करण्यात आल्याने, राज्य सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. विरोधी पक्ष भाजपाने या मुद्द्य्यावरून सरकारला धारेवर धरलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांकडून सरकारवर निशाणा साधला गेला आहे.

“आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही घरात बसून असता, पण विद्यार्थी परीक्षेच्या ठिकाणी पोहोचले आहेत. यातूनही एखादा ‘स्वप्नील लोणकर’ तयार व्हावा असे सरकारला वाटते का? तुमच्या या भोंगळ कारभारात विद्यार्थ्यांचा बळी घेऊ नका, त्यांच्या भवितव्याशी खेळू नका.” अशा शब्दांमध्ये भाजपाने राज्य सरकारवर टीका केली आहे.

“…त्या पदांसाठी ५ ते १५ लाखांची दलाली सुरू झालीये”; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांच्या लेखी परीक्षेतील गोंधळामुळे अखेर ही परीक्षाच रद्द करण्यात आली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी रात्री याबाबत माहिती दिली आहे. ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप व संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

राज्यातील १५०० केंद्रांवर एकाच वेळी ही भरती प्रक्रिया शासनाने निवडलेल्या खासगी बाह्य स्त्रोतांमार्फत केली जाणार होती. परीक्षेचे नियोजन आधीच केले असतानाही परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपनीकडून विद्यार्थ्यांना दोन दिवसांआधी ओळखपत्र देण्यात आले. या ओळखपत्रांमध्ये अक्षम्य चुका होत्या. काही विद्यार्थ्यांचे ओळखपत्रच डाऊनलोड होत नसल्याने त्यांना ई-मेलवर नाव आणि परीक्षा केंद्र व बैठक क्रमांक पाठवण्यात आले. मात्र, परीक्षेच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना या ई-मेलच्या आधारे परीक्षा देता येईल का? असा प्रश्न होताच. या ई-मेलवरही अनेक चुकीचे केंद्र देण्यात आले होते. शुक्रवारी रात्रीपर्यंत ओळखपत्रांचा हा सगळा गोंधळ सुरूच राहिल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे अखेर परीक्षाच रद्द करण्यात आली आहे.

स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने स्वप्निल लोणकरने केली होती आत्महत्या –

स्पर्धा परीक्षांच्या तयारीचं केंद्र बनलेल्या पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर या २४ वर्षीय तरुणाने जुलै महिन्यात गळफास घेऊन जीवन संपवलं होतं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्यानं त्याने आत्महत्या केली होती. एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही दोन वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्निल हळूहळू नैराश्यात गेला होता. या काळात त्याच्या घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यासारख्या कारणांमुळेही स्वप्निलवरील तणाव वाढत गेला होता. अखेर त्याच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्याने हे टोकाचं पाऊल उचललं होतं.

राज्य शासनाची आरोग्य विभागाची गट क आणि गट ड ही परीक्षा पुढे ढकलली

आता आरोग्य विभागाची परीक्षा अचानक रद्द करण्यात आल्याने, विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या संतापाच्या व नैराशाच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर भाजपाने राज्य सरकारला …यातूनही एखादा ‘स्वप्नील लोणकर’ तयार व्हावा असे सरकारला वाटते का? असा सवाल केला आहे.