भाजपा आणि शिवसेना यांची युती २०१९च्या विधानसभा निवडणुकांनंतर तुटली. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. तेव्हापासून भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना महाराष्ट्रात पाहायला मिळतो आहे. भाजपाचे नेतेमंडळी अनेक वेळा राज्य सरकारला टोला लगावताना दिसतात. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नुकतंच एका मुद्द्यावरून महाविकास आघाडीला टोला लगावला. त्यावर, “देवेंद्रजी, तुम्हाला लवकरच संधी मिळेल”, असं विधान राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मेट्रोत बसून फोटो काढला होता. तो फोटो ट्विट करत, मुंबई मेट्रोतून कधी प्रवास करता येईल? असा खोचक सवाल महाविकास आघाडी सरकारला विचारला होता. त्यावर महेश तपासे यांनी त्यांना उत्तर दिलं.

फडणवीस यांचे ट्विट-

आणखी वाचा- मुंबईत असा प्रवास कधी करता येणार?; मेट्रोसंदर्भातील फडणवीसांच्या प्रश्नावर काँग्रेस म्हणते…

तपासे यांचं रोखठोक उत्तर

“मुंबई मेट्रो-३ हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकार पूर्ण करेल यात शंका नाही. परंतु केंद्राकडून वारंवार अडथळा निर्माण केला जात आहे, अशी मुंबईकरांची भावना आहे. त्यामुळे केंद्रासोबत आपण जर संवाद साधलात तर प्रकल्प लवकर पूर्ण होऊ शकेल आणि तुम्हालाही मुंबई मेट्रो-३ मध्ये प्रवास करण्याची व फोटो काढून ट्वीट करण्याची लवकरच संधी मिळेल”, असं उत्तर महेश तपासे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं.

“देवेंद्र फडणवीस यांना फोटो काढून ट्वीट करण्याची व फिरण्याची संधी मिळावी ही मुंबईकरांचीही अपेक्षा आहे. महाविकास आघाडी सरकार मुंबईत मेट्रो-३ लवकरच सुरू करेल याचा मला विश्वास आहे. सरकार हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. परंतु वारंवार केंद्राकडून मदतीऐवजी आडकाठी होत आहे. असे प्रकार थांबले तर मुंबईकरांना लवकर दिलासा मिळेल”, असंही तपासे यांनी नमूद केलं.