राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. काही आमदारांनी पक्षादेश डावलून मतदान केल्यानं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झाले होते. यानंतर आता राष्ट्रपती निवडणुकीत देखील महाविकास आघाडीची मतं फुटणार असल्याचा दावा भाजपाच्या नेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत. अशी एकंदरीत स्थिती असताना काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मोठं विधान केलं आहे. भाजपालाच मतं फुटण्याची भीती असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भाजपा नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या दाव्याबाबत विचारलं असता नाना पटोले म्हणाले, “ज्या लोकांची मतं फुटायला लागली आहेत, तेच लोक मतदानासाठी आपल्या आमदारांना बसमधून आणतात. मतं फुटण्याची भीती कुणाला आहे? हे चित्र तुम्हीच पाहू शकता. भाजपाच्या आमदारांना कशाप्रकारे एकत्रित बसमधून आणलं जात आहे. त्यांना सुरक्षाव्यवस्था पुरवली जात आहे. त्यामुळे ज्यांची मतं फुटणार आहेत, तेच असे आरोप करतात” असं स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिलं आहे.

दुसरीकडे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर मित्रपक्षांची मतं फुटणार नसून सर्वजण राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनाच मतदान करणार असल्याचा विश्वास काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा- राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची मतं फुटणार? आशिष शेलार यांचं सूचक विधान

दरम्यान, आज सकाळी भाजपा नेते आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की “राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मूर्मू यांचा विजय निश्चित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातून होणाऱ्या मतदानातून आम्हाला रेकॉर्ड ब्रेक बढत मिळेल, हे आम्ही आधीच स्पष्ट केलं आहे. पक्षबंधनं आणि पक्षमर्यादा डावलून हे सर्वपक्षीय मतदान होईल. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचं आपल्याला दिसेल. महाराष्ट्रातून आम्हाला जी बढत मिळेल, तो नवीन राजकीय इतिहास असेल.”

हेही वाचा- Presidential Election : नितीन राऊतांच्या मतदानावर बबनराव लोणीकरांचा आक्षेप, निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे त्यांनी सांगितलं “मला महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं अस्तित्वच दिसत नाहीये. त्यांच्यात समन्वय असणं, हा तर खूप लांबचा विषय आहे. जे रोज तोंडावर आपटले आहेत, ते पुन्हा एकदा उभं राहण्याचा प्रयत्न करत आहेत. विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत देखील आमची मतं फुटणार नाहीत, असं ते म्हणाले होते. पण आज द्रौपदी मूर्मू यांचं समर्थन जनतेत एवढं आहे की, अनेकजण पक्षमर्यादा सोडून किंबहुना पक्षमर्यादा झिडकारून आमदार महोदय मूर्मू यांना मतदान करतील” असंही शेलार म्हणाले.