उत्तर प्रदेशमीधल लखीमपूर खेरी येथील हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा बळी गेल्यामुळे सोमवारी देशभरात तीव्र पडसाद उमटल्याचे दिसून आले. काँग्रेससह विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून भाजपा व पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. तर, या घटनेच्या निषेधार्थ आक्रमक झालेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी लखीमपूर खेरी येथे जाण्यास निघाल्या होत्या, मात्र त्यांना पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतलं व सीतापूर इथल्या विश्रामगृहात ठेवण्यात आलं होतं. आता त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले असून सीतापूर विश्रामगृहातच तात्पुरतं जेल उभारत बंदिस्त करण्यात आलं आहे. यावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे.
“भाजपाने क्रौर्याची परिसीमा गाठली आहे. माणसेच चिरडत आहेत. हा माज जनतेनेच उतरविला पाहिजे. आंदोलन करणाऱ्या प्रियंका गांधी कोठडीत व चिरडणारे भाजपा नेते मोकळे आहेत. ४५ लाख देऊन शेतकऱ्यांचा आवाज विकत घेण्याचा प्रयत्न आहे. मोदी गप्प का?” असं सचिन सावंत यांनी ट्विटद्वारे विचारलं आहे.
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या बनवीरपूर गावात ही हिंसाचाराची घटना घडली. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे एका कार्यक्रमासाठी गावात येणार होते. मौर्य यांच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी जमलेल्या कृषी कायदेविरोधी शेतकरी आंदोलकांवर कथितरीत्या दोन कार घुसवल्यानंतर हिंसाचार घडला. आंदोलकांनी या दोन गाड्यांना आग लावल्याचाही आरोप करण्यात येत आहे. या घटनेनंतर रात्री उशीरा या ठिकाणी पाहणीसाठी पोहचलेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना सोमवारी पोलिसांनी ताब्यात घेतलं. रविवारी रात्री अकराच्या सुमरास प्रियंका गांधी लखीमपूर खेरी येथील घटनास्थळी जाण्यासाठी रवाना झाल्या होत्या.