मुंबई : वेदान्त समूह आणि फॉक्सकॉनच्या भागादारीतून महाराष्ट्रात १ लाख ६६ हजार रुपयांची गुंतवणूक होणार होती. मात्र, वेदान्त समूहाने गुजरातमध्ये हा प्रकल्प उभारणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. त्याला आता भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहेत. तसेच, वेदान्त प्रकल्प महाराष्ट्रात कधी आला होता, असा सवाल उपस्थित करत शेलार यांनी आदित्य ठाकरेंचा समाचार घेतला आहे.

आशिष शेलार म्हणाले की, “वेदान्त समुहाला ठाकरे सरकारने काय सवलत दिली, त्याचा पुरावा दाखवावा. अथवा भूमिपूजन, पायाभरणी झाल्याचं चित्र दाखवावे. करारनामा सुद्धा झालेल नसतात, प्रकल्प गेला हा शिवसेनेचा जावाईशोध कुठला आहे.”

“वेदान्त प्रकल्प येणार आहे…”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात बोलताना वेदान्त प्रकल्प राज्यात होणार असल्याचं सागितलं होते, असा प्रश्न शेलार यांना विचारला. “प्रकल्प महाराष्ट्रात होणार आहे. मात्र, राज्यात आलेला प्रकल्प गेला, असं आदित्य ठाकरे खोटे बोलून लोकांना सांगत आहेत. एकनाथ शिंदे यांनी वेदान्त प्रकल्प येणार आहे, याची माहिती दिली होती. वेदान्त ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी ट्विट करून सांगितलं, याच्याशी संबंधित प्रकल्प महाराष्ट्रात आम्ही आणत आहोत. पण, आदित्य ठाकरेंनी पेंग्विन जावाईशोध कसा लावला,” असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे.

“निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची…”

आदित्य ठाकरेंनी म्हटलं आम्ही सक्षम नाही. तुम्ही सक्षम आहात, तर प्रकल्प आणून का नाही दाखवला. “नक्कीच प्रकल्प आम्ही आणून दाखवणार आहे. आज दोन महिने झालं, तुम्ही ऐवढे ओरडत आहे. महाविकास आघाडीच्या कार्याकाळातील अडीच वर्षाचा हिशोब मागायला पाहिजे. किती जणांशी चर्चा केली, किती प्रकल्प सुरू झाले, किती प्रकल्पांची पायाभरणी झाली, किती प्रकल्पांत कमिशनचा व्यवहार झाला, यासाठी निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री शिंदेकडे केली आहे,” असेही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.