scorecardresearch

राज ठाकरेंच्या ‘असा महाराष्ट्र कधी पाहिला नाही’च्या टीकेवर बावनकुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले “शिवराळ भाषेचा…”

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात काँग्रेस, भाजपा आणि शिंदे गटातील नेत्यांवरही टीका केली.

राज ठाकरेंच्या ‘असा महाराष्ट्र कधी पाहिला नाही’च्या टीकेवर बावनकुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले “शिवराळ भाषेचा…”
चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरे (फोटो- यूट्यूब)

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी (२७ नोव्हेंबर) धडाकेबाज भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेस, भाजपा आणि शिंदे गटातील नेत्यांवरही टीका केली. महाराष्ट्रातील राजकारण खालच्या थराला जात आहे. भाषेचा वापर जपून केला पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. तसेच वेगवेगळ्या पक्षांचे प्रवक्ते, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर त्यांनी कठोर शब्दांत टीका केली. राज ठाकरेंच्या याच टीकेवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे जे बोलले ते खरं आहे. आमच्याकडून शिवराळ भाषेचा कधीच वापर होत नाही. मात्र एखाद्याने सुरुवात केल्यावर दुसऱ्याला त्याचा शेवट करावा लागतो, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. ते रविवारी माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

हेही वाचा >>> राज ठाकरेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल, म्हणाले “अरे गधड्या तुझी लायकी…”

“शिवराळ भाषेचा वापर आमच्याकडून कधीच होत नाही. खरंतर अशा भाषेचा वापर कोण करतंय हे राज ठाकरे यांनादेखील माहिती आहे. राज ठाकरे खरं बोलले आहेत. सर्वांनीच तारतम्य बाळगले पाहिजे. कोणीतरी सुरुवात करत असेल तर कोणालातरी शेवट करावाच लागतो. त्यामुळे सुरुवातच कोणी करू नये, असे मला वाटते,” अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

हेही वाचा >>> सुप्रिया सुळेंवरील विधानावरून राज ठाकरेंचा सत्तारांवर हल्लाबोल, प्रवक्त्यांवरही संतापले, म्हणाले…

“हल्ली कोणीही काहीही बरळत आहे. राजकारणाचा दर्जा खूप खाली जात आहे. त्याला मर्यादा राहिलेली नाही. राजकीय पक्षांचे प्रवक्ते काहीही बोलतात. राज्यातील एक मंत्री महाराष्ट्रातील महिला नेत्यावर अभद्र शब्दांत टीका करतो. आजपर्यंत मी असा महाराष्ट्र कधीही पाहिला नाही. इतपर्यंत आपली पातळी खाली गेली आहे का? इतक्या खाली आपल्याला जायचे असेल तर महारापरुषांची नावे घेणे बंद केले पाहिजे. काय बोलत असतात, त्यांची भाषा काय असते. त्यांना वाटते मी विनोद करतोय,” असे राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >>> “राज ठाकरेंचं आजचं भाषण म्हणजे भाजपाच्या कानाखाली…” फडणवीस, सत्तारांचं नाव घेत अमोल मिटकरींची प्रतिक्रिया

“काही-काही लोक तर खूप काही बोलतात. तू कोण आहेस, आपली लायकी काय आहे. आपण काय बोलत आहोत, याचे भान नाही. शाळेत, कॉलेमध्ये असलेली मुलं जेव्हा टीव्ही चॅनेल्स पाहत असतील, प्रवक्त्यांना बोलताना पाहत असतील तर, त्यांना वाटेल राजकारण सोपे आहे. आपण महाराष्ट्राला कोठे घेऊन चाललो आहोत. याची मला जास्त चिंता वाटते,” अशा भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 08:04 IST

संबंधित बातम्या