गेल्या काही दिवसांपासून केंद्रातील विरोधीपक्ष काँग्रेसने अदाणी प्रकरणावरून केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. हिंडेनबर्ग कंपनीने अदाणी समूहावर अहवाल सादर केल्यानंतर देशातील राजकीय वातावरण तापलं होतं. याप्रकरणी काँग्रेसने जेपीसी चौकशीची मागणी केली होती. अशी एकंदरीत स्थिती असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या विपरीत भूमिका घेतली होती. अदाणी प्रकरणात जेपीसी चौकशीची गरज नाही, असं विधान शरद पवारांनी केलं होतं. विरोधकांची मागणी असेल तर जेपीसी चौकशी करायला काही हरकत नाही, असंही पवार म्हणाले होते.

या घटनाक्रमानंतर आज अदाणी समूहाचे प्रमुख गौतम अदाणी यांनी ‘सिल्व्हर ओक’वर जाऊन शरद पवारांची भेट घेतली. अदाणी आणि पवारांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. या बैठकीवरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार आणि गौतम अदाणी यांच्या बैठकीचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही, असं विधान चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं.

हेही वाचा- “काहीही झालं तरी राजकीय भूकंप होणारच…”, अंबादास दानवेंचं मोठं विधान!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले, “माझा महाराष्ट्राबाबत जो काही अभ्यास आहे, त्यावरून सांगतो की, मागील अनेक वर्षांपासून शरद पवार आणि गौतम अदाणी यांच्यात चांगले संबंध आहेत. चांगले संबंध असल्यामुळे भेटीगाठी होऊ शकतात, म्हणून त्यांच्या बैठकीचा अर्थ वेगळा लावू नये. माझ्या दृष्टीने ते काही योग्य नाही. कारण गौतम अदाणी आणि शरद पवार चांगले जवळचे मित्र आहेत. तसेच राजकीय व्यक्तीने उद्योगपतींशी मैत्री ठेवणं अयोग्य नाही.”

हेही वाचा- सत्तांतराच्या चर्चेदरम्यान राज ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा?

“हिंडेनबर्ग संस्थेच्या अहवालावरून काँग्रेसने अदाणींविरुद्ध रान उठवलं आहे. पण विदेशातील एखादी संस्था किंवा यंत्रणेवर आपण किती विश्वास ठेवायचा हाही प्रश्न आहे. शरद पवार यांनीही या गोष्टीकडे लक्ष वेधलं आहे,” असंही बावनकुळे म्हणाले.