राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीकडून काल मुंबईत महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चाला लाखोंच्या संख्येत जनतेकडून पाठिंबा मिळाल्याचा दावा महाविकास आघाडीकडून केला जात असतानाच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या मोर्चाचे वर्ण ‘नॅनो’ मोर्चा असे केले. यामुळे शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी एक व्हिडीओ ट्वीट करून मोर्चाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद दर्शवण्याचा प्रयत्न केला.

संजय राऊतांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओत भगवे झेंडे हातात घेतलेल्या लोकांची गर्दी दिसत आहे. ही गर्दी महामोर्चात आलेल्या लोकांनी केल्याचा दावा राऊतांनी केला आहे. याशिवाय त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “देवेंद्र फडणवीस ज्यास ‘नॅनो’ मोर्चा म्हणून हिणवलं, तो हाच मोर्चा आहे. देवेंद्रजी, असं वागणं बरं नाही,” असा टोलाही राऊतांनी लगावला आहे. मात्र या व्हिडीओवर आता देवेंद्र फडणवीसांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. संजय राऊतांनी ट्वीट केलेला व्हिडीओ मराठा मोर्चातील असू शकतो, असं फडणवीसांनी म्हटलं आहे. या व्हिडीओची मी पडताळणी करणार आहे, असंही फडणवीस म्हणाले आहेत. ते अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा – “छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुरावा मागणारे, मांडीला मांडी लावून बसतात आणि…” फडणवीसांचे अजित पवारांना प्रत्युत्तर!

या पार्श्वभूमीवर आता भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. “सर्वज्ञानींना आता काय म्हणावं?, अजून किती उघडे पडाल? परवा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील अज्ञानानं तोंडघशी पडले ते काही कमी झालं नाही. तर आता चक्क नॅनो मोर्चाचं अपयश झाकायला थेट मराठा मोर्चाचा आधार घेतला?” असं चित्रा वाघ यांनी ट्वाट केलं आहे.

याशिवाय, “अहो सर्वज्ञानी संजय राऊत मविआ मोर्चा म्हणून तुम्ही पोस्ट केलेला व्हीडिओ तरी निदान पहा. हा आहे २०१७ चा मराठा समाजाचा खरा विराट मोर्चा. देवेंद्र फडणवीसांची टीका खरी होती म्हणून काय थेट अशी सारवासारव? हा तर मराठा समाजाचाही अपमानंच.” असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फडणवीस काय म्हणाले? –

राऊतांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत फडणवीस म्हणाले, “संजय राऊतांनी आज एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. मी काल महाविकास आघाडीच्या मोर्चाला ‘नॅनो मोर्चा’ म्हटलं होतं, कारण तो मोर्चा ‘नॅनो’च होता. सात संघटना एकत्र करूनही त्यांना २०-२२ हजार लोक जमा करता आले नाही, असा तो मोर्चा होता. पण संजय राऊतांनी ट्वीट केलेला व्हिडीओ मराठा मोर्चातील आहे, अशी माहिती मला मिळाली आहे. याची मी नक्की पडताळणी करेन. हा व्हिडीओ मराठा मोर्चातील असू शकतो. कारण ‘मविआ’चा मोर्चा एवढा मोठा नव्हताच. त्यामुळे राऊतांना दुसऱ्या मोर्चाचा व्हिडीओ ट्वीट करावा लागला.”