मराठवाड्याला मुंबईशी जोडणाऱ्या जालना – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसची सुरुवात आज झाली. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या एक्सप्रेसचा शुभारंभ केला. यावेळी माध्यमांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी वंदे भारत रेल्वे, मराठवाड्याचा विकास आणि अयोध्येतील राम मंदिराचे उदघाटन व बाबरी पतन या विषयांवर सविस्तर भाष्य केले. बाबरी मशीद पाडल्यानंतर बाळासाहेबांनी एक वाक्य बोलल्यामुळे तेव्हा घरी बसणारे लोक आज बाबरी पाडण्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असले तरी शिवसेनेचे कुणीही नेते त्याठिकाणी उपस्थित नव्हते, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी त्यांचा कारसेवेचा अनुभवही सांगितला.

“डॉ. फडणवीस वगैरे लोक पिचक्या मांडीवर थाप मारून सांगत आहेत, ‘राममंदिराच्या लढ्यात शिवसेनेचे योगदान काय? हिंमत असेल तर अयोध्येत या, तुमच्या छाताडावर मंदिर उभे केले आहे”, अशी टीका सामना दैनिकाच्या अग्रलेखातून दि. २७ डिसेंबर रोजी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

हे वाचा >> “कदाचित फडणवीसांच्या वजनानेच बाबरी…”, उद्धव ठाकरेंची खोचक टीका; म्हणाले, “मी त्यांना धन्यवाद देतो की…”

बाबरी मशीद पाडली तेव्हा मी..

देवेंद्र फडणवीस यांनी झी २४ तासशी बोलत असताना बाबरी मशीद पाडण्याच्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, “अयोध्येत २२ जानेवारी रोजी राम मंदिराचे उदघाटन होणार आहे. याचा मला मनस्वी आनंद वाटतो. ज्यावेळेस पहिल्यांदा राम शीला पूजन झाले, तेव्हा माझे वय १८ वर्षांचे होते. पहिल्या कारसेवेच्या वेळी मी स्वतः गेलो होतो. अयोध्येतून रामजन्मभूमीच्या ठिकाणी पायी चालत जात असताना आमच्यावर लाठीचार्ज झाला. बदायू येथील केंद्रीय कारागृहात मी १७ ते १८ दिवस काढले.” त्यानंतर १९९२ साली मी पुन्हा अयोध्येत गेलो होतो. बाबरीचा ढाचा पाडला, तेव्हाचा आनंद वेगळाच होता. तो शब्दात सांगता येणार नाही. अटलजींच्या काळातही पुन्हा कारसेवा झाली, तेव्हाही आम्ही गेलो होतो, अशीही आठवण फडणवीस यांनी सांगितली.

हे वाचा >> “शिवसैनिक बाबरीवर घाव घालताना मैदान सोडून पळून गेलेले रणछोडदास आता…”, ठाकरे गटाचा फडणवीसांवर हल्लाबोल

श्रेय घ्यायचे नाही, असे ठरले होते

“बाबरीचा ढाचा पडला, तेव्हा भाजपाचीच माणसे तिथे होते. जे लोक (शिवसेना उबाठा गट) तिथे असण्याचा दावा करत आहेत, त्यांच्यापैकी कुणीही उपस्थित नव्हते. तिशल्या मंचावर आडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती उपस्थित होत्या. त्यामुळे दावा करणारे केवळ वाचाळवीर आहेत, त्यांचा या घटनेशी दुरान्वये संबंध नाही. आम्हाला सांगण्यात आले होते की, कोणत्याही संघटनेने श्रेय घ्यायचे नाही. ढाचा कुणी पाडला असे विचारल्यानंतर कारसेवकांनी पाडला, असे बोलायचे. हे ठरले होते. आम्ही शिस्त पाळणारे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे आम्ही तसेच उत्तर दिले”, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

बाळासाहेबांच्या त्या वाक्यामुळे घोळ

“बाळासाहेबांना जेव्हा विचारण्यात आले की, बाबरी पाडणाऱ्यांमध्ये तुमचे लोक आहेत का? तेव्हा बाळासाहेब इतकेच म्हणाले की, “ते आमचे लोक असतील तर मला त्याचा अभिमान आहे.” हे साधे वाक्य होते. मात्र जे लोक घराबाहेर पडले नाहीत. त्यांनी बाळासाहेबांच्या त्या वाक्याचा आधार घेऊन श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला”, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

आणखी वाचा >> “बाबरी मशीद पुन्हा…”, जेएनयू विद्यापीठाच्या भिंतीवर वादग्रस्त घोषणा; काँग्रेसच्या संघटनेचे नाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरे यांच्या काळात विकास ठप्प

जालना-मुंबई वंदे भारत सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील वाहुतकीच्या प्रश्नावर भाष्य केले. ते म्हणाले, “मराठवाड्यातील रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करणे, रेल्वेचे इलेक्ट्रिफिकेशन आणि त्यासोबत नवीन ट्रॅक टाकण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आमच्या सरकारने केंद्र सरकारशी समन्वय साधत केंद्राएवढेच अनुदान देत रेल्वे प्रकल्प वेगाने पुढे नेले आहेत. मधल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरे यांच्या सरकारने केंद्राच्या निधीएवढा हिस्सा राज्यातून देण्यास विरोध केला होता. हा अत्यंत चुकीचा निर्णय होता, ज्याचा फटका मराठवाड्याला बसला. मात्र आता मराठवाड्यातील कामे वेगाने सुरू आहेत. कारखानदारीसाठी संभाजीनगर आणि जालना हे महत्त्वाचे जिल्हे ठरणार आहेत. त्यामुळे या दोन जिल्ह्यांना देशाच्या आर्थिक राजधानीशी म्हणजे मुंबईशी जोडणे अत्यंत आवश्यक होते. हे केल्यामुळे आता याचा चांगला परिणाम पाहायला मिळेल.”