scorecardresearch

“हसन मुश्रीफांना हिशोब द्यावा लागणार” भ्रष्टाचाराचे आरोप करत किरीट सोमय्यांचा सूचक इशारा!

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

“हसन मुश्रीफांना हिशोब द्यावा लागणार” भ्रष्टाचाराचे आरोप करत किरीट सोमय्यांचा सूचक इशारा!

भारतीय जनता पार्टीचे नेते मोहीत कंबोज यांनी अलीकडेच सिंचन घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक बडा नेता लवकरच तुरुंगात जाणार असं विधान त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून केलं होतं. यानंतर आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

सोमय्या यांनी एक व्हिडीओ जारी करत म्हटलं की, “राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी मंत्री असताना स्वत:च्या जावयाच्या जयोस्तुते कंपनीला १५०० कोटी रुपयांचं कंत्राट दिलं. हा भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणला होता. या प्रकरणाची आता लोकायुक्तांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. २४ ऑगस्टला यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे हसन मुश्रीफांना हिशोब द्यावा लागणार आहे.”

हेही वाचा- मोहीत कंबोज आणि फोन टॅपिंग प्रकरणातील अधिकारी रश्मी शुक्ला फडणवीसांच्या निवासस्थानी दाखल, चर्चांना उधाण

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी आज ट्वीट करत यासंदर्भातील एक पत्रही शेअर केलं आहे. त्यानुसार, हसन मुश्रीफ यांचे जावई मतीन मंगोली यांच्याशी संबंधित जयोस्तुते प्रा. लि. कंपनीला दिलेल्या कंत्राटाचा उल्लेख करण्यात आला आहे. राज्यातील ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषदांचे रिटर्न्स भरण्यासाठी देण्यात आलेल्या १५०० कोटींच्या कंत्राटात झालेल्या घोटाळ्याची चौकशी लोकायुक्तांकडून सुरू करण्यात आल्याचं म्हटलं आहे.

सदर चौकशीचे आदेश राज्यपालांनी दिल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. २४ ऑगस्ट रोजी लोकायुक्तांसमोर मुश्रीफ यांनी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं आहे. सिंचन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या अडचणी वाढत असताना, आता हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप असलेल्या नव्या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या