रुग्णांना रक्ताची टंचाई भासू नये म्हणून रक्तदान शिबीर घेणे ही नित्याची बाब आहे. अनेक स्वयंसेवी संस्था, मंडळे व राजकीय पक्ष अशा प्रकारच्या शिबीरांचे आयोजन करतात. असंच एक रक्तदान शिबीर शिवसेनेच्या माहीम-वरळी शाखेनेही आयोजित केलं, पण या शिबीराची जास्तच चर्चा रंगली. याचं कारण या शिबीरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास एक किलो चिकन किंवा पनीर देण्यात येणार असल्याचे बॅनर परिसरात झळकले. या मुद्द्यावरून भाजपाचे नेते राम कदम यांनी शिवसेनेवर आणि सरकारवर टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना काळात रूग्णसंख्या वाढल्याने महाराष्ट्रात आणि मुंबईत रक्ताची कमतरता भासत असल्याचे अनेकदा नेतेमंडळी, मंत्री आणि अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि विविध संबंधित अधिकारी यांनी आपल्या निवेदनातून नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले. त्यानंतर शिवसेनेच्या या आगळ्यावेगळ्या रक्तदान शिबीरावर राम कदम यांनी टीकास्त्र सोडलं. “राज्यात आणि मुंबईत रक्तसाठ्याचा तुटवडा आहे. या तुटवड्यासाठी ठाकरे सरकारचा निष्काळजीपणा जबाबदार आहे. रक्तदान शिबीर आयोजित करून रक्तदात्यांना चिकन किंवा पनीरचं आमिष दाखवलं जातंय. अशा प्रकारची नामुष्की ओढवण्यामागे सरकारचा निष्काळजीपणाच कारणीभूत आहे”, असे राम कदम यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हणाले.

कोविड महामारीच्या काळातील वैद्यकीय आणीबाणीमुळे मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी रक्ताची टंचाई भासू लागली आहे. हे लक्षात घेऊन शिवसेनेचे नगरसेवक समाधान सरवणकर यांनी या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. या शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास एक किलो चिकन देण्यात येणार आहे. रक्तदाते शाकाहारी असल्यास त्यांना एक किलो पनीर देण्यात येणार आहे असे बॅनर स्थानिक भागात लावण्यात आले आहेत. १३ डिसेंबर रविवारी हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. प्रभादेवीच्या राजाभाऊ साळवी मैदानावर हे रक्तदान शिबीर असणार आहे. त्यासाठी ११ डिसेंबरपूर्वी नोंदणी करायची आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader ram kadam slams cm uddhav thackeray aaditya thackeray shiv sena for offering chicken for blood donation vjb
First published on: 09-12-2020 at 14:11 IST