Shivsena MLA Disqualification Verdict Updates: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्याआधीच भाजपा व शिंदे गटाच्या नेत्यांनी शिंदे गटाच्याच बाजूने निकाल लागेल, अशी जाहीर भूमिका मांडल्यावर त्यावर ठाकरे गटाकडून टीका करण्यात आली. सत्ताधाऱ्यांना इतका आत्मविश्वास आहे याचा अर्थ ही मॅच फिक्स्ड आहे, अशा शब्दांत संजय राऊतांनी यासंदर्भात परखड टीका केली. यावर आता भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी खोचक टोला लगावला आहे. “सूर्य पूर्वेकडून उगवतो, यात आत्मविश्वासाचा काय संबंध?” असा उलट प्रश्न मुनगंटीवार यांनी केला आहे.
मुनगंटीवारांनी केला गोबेल्स नीतीचा उल्लेख
विरोधी पक्षांकडून सरकार बेकायदेशीर असून राहुल नार्वेकर फक्त ठरलेला निकाल सांगणार असल्याची टीका केली जात असताना मुनगंटीवार यांनी त्याला गोबेल्स नीतीची उपमा दिली आहे. “न्यायप्रक्रियेची चूक असल्याचं सांगणं सुरू झालं आहे. जर्मनीच्या गोबेल्सची ही नीती आहे. अनेकदा खोटं बोला, म्हणजे लोकांना हे खरं वाटतं”, असं मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
संजय राऊतांना टोला
दरम्यान, यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. “याआधीही अनेकदा काँग्रेसच्या राज्यात संजय राऊतांनी लोकशाही धोक्यात आहे असं म्हटलं आहे. काही लोकांना लांडगा आला रे आलासारखी सवय असते. त्या कथेचा अंत काय होतो हे आपल्याला माहिती आहे. कुणीही महाराष्ट्रातल्या जनादेशाचा अवमान करू नये”, असं मुनगंटीवार माध्यमांना म्हणाले.
“पंतप्रधानांना आजचा निकाल माहिती आहे”, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, “निर्णय दिल्लीतून झालाय”…
“सरकारला घटनाबाह्य म्हटलं नाही, तर शिवसैनिकांच्या मनातून राऊत कायमचे उतरतील. त्यातून ते कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत”, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला.
“एक हजार वकील जर म्हणाले की सूर्य पश्चिमेकडून उगवतो…”
सत्ताधाऱ्यांना निकाल शिंदे गटाच्याच बाजूने लागेल एवढा आत्मविश्वास कुठून आला? असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला आहे. त्यावर मुनगंटीवारांनी टोला लगावला आहे. “सूर्य पूर्वेकडूनच उगवतो. त्यात आत्मविश्वासाचा काही संबंध आहे का? हा तर सृष्टीचा नियम आहे. सत्याचा विजय होतो, यात आत्मविश्वासाचा प्रश्न कुठे येतो. उद्या एक हजार वकील सूर्य पूर्वेकडून उगवतो म्हणाले आणि एकच वकील पश्चिमेकडून उगवतो असं म्हणाले तर त्यात आत्मविश्वासाचा विषयच कुठे येतो?” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.