नीलेश पवार, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नंदुरबार : जिल्हानिर्मितीच्या २४ वर्षांनंतर जिल्हा परिषदेत आदिवासी विकासमंत्री आणि भाजपचे नेते डॉ. विजयकुमार गावितांनी सत्तारूपाने कमळ फुलविण्याची किमया केली. सर्वाधिक सदस्य संख्या असूनही काँग्रेसच्या नेत्यांवरील नाराजी डॉ. गावित यांच्या पथ्थ्यावर पडली. जिल्ह्याचे पालकमंत्री स्वत: डॉ. गावित यांच्याकडे, त्यांची एक कन्या खासदार तर दुसरी आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवडून आल्याने नंदुरबार जिल्ह्यात सारीच महत्त्वाची पदे गावित यांच्याकडे एकवटली आहेत.

अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत सत्तांतर झाले. केवळ २० सदस्य असलेल्या भाजपने काँग्रेसचे नाराज पाच तसेच शिवसेना ठाकरे गटाचे दोन आणि राष्ट्रवादीचे चार सदस्य यांच्या साथीने जादुई ३१ हा आकडा गाठला. शिंदे गट वगळता इतर सर्वच पक्षांमधील असंतुष्टांची मोट बांधण्याचे काम मुरब्बी राजकारणी डॉ. गावित यांनी तडीस नेले. त्यामुळे जिल्ह्यात आता एकूणच ‘गावित एके गावित’ असे चित्र आहे.

अडीच वर्षांपूर्वी सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात चर्चा झाली होती. परंतु, वरिष्ठ स्तरावरून निरोप आल्याने त्यावेळी शिवसेनेने महाविकास आघाडीचा धर्म पाळून काँग्रेसला साथ देत सत्ता स्थापन केली होती.

आपल्या कुटुंबातील सर्वच सदस्यांना कोणते ना कोणते सत्तापद मिळवून देण्याचा चंग बांधलेल्या डॉ. गावितांनी आदिवासी मंत्रीपद येताच काँग्रेसमधील नाराज सदस्यांना हेरले. काँग्रेसला सत्तेत असताना त्यांच्या सदस्यांची नाराजी दूर करता आली नसल्यानेच सत्तांतर झाल्याचा दावा करणाऱ्या डॉ. गावितांनी मात्र अध्यक्षपदी आपली कन्या सुप्रिया यांना बसविले. उपाध्यक्षपदी बंडखोर काँग्रेस गटाचे सुहास नाईक यांना संधी दिली. सभापतीपदाच्या निवडणुकीतदेखील इतर घटक पक्षांना संधी देत सत्तेचा समतोल राखला.

महाविकास आघाडीच्या काळात आदिवासी मंत्री राहिलेले काँग्रेस नेते अ‍ॅड. के. सी. पाडवी यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना सांभाळण्यात अपयश आल्याचे यावरून दिसून येते. नाराज काँग्रेस सदस्यांकडे केलेले दुर्लक्ष, त्यातच माजी मंत्री पद्माकर वळवी यांची कन्या जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांच्याकडूनही सदस्यांच्या समस्यांकडे झालेले दुर्लक्ष या बंडाळीला कारणीभूत ठरले आहे. पद्माकर वळवींचे खंदे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुहास नाईक, नटवर पाडवींनी त्यांच्याच विरोधात बंडाचे निशाण फडकविले. काँग्रेसमधून ओबीसींचा चेहरा म्हणून निवडून आलेल्या एकमेव सदस्या हेमलता शितोळे यांनी देखील काँग्रेसची साथ सोडली. शहादा शहर प्रभारी म्हणून त्यांची नाना पटोलेंनी नियुक्ती केली होती. परंतु, या नियुक्तीला काही जणांकडून झालेल्या विरोधामुळेच त्यांनी थेट भाजपला मदत केली.

काँग्रेसच्या जिल्ह्यातील चारही तालुक्यात झालेली सदस्यांची बंडाळी त्यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. विशेष म्हणजे राज्यात भाजपने शिवसेनेच्या ठाकरे गटाची सर्वाधिक वाईट अवस्था केली असतानाही ठाकरे गटाच्या दोन सदस्यांनी भाजपला दिलेला पाठिंबा सर्वानाच चकित करणारा आहे. काँग्रेसने विश्वासात घेतले नसल्याचा ठाकरे गटाचा दावा असला तरी काँग्रेससोबत असलेल्या शिंदे गटाला पायउतार करून वचपा काढण्यासाठीच ठाकरे गटाने ही खेळी खेळल्याचे दिसून येत आहे. या सत्ता संघर्षांत सर्वाधिक नुकसान हे शिंदे गटाच्या चंद्रकांत रघुवंशी यांचे झाले आहे. राज्यात भाजपसोबत सत्तेत असलेला शिंदे गट नंदुरबार जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या फुटीमुळे सत्तेबाहेर गेला आहे. जिल्ह्यात सत्ता नसल्याने भाजपशी असलेले त्यांचे संबंध अधिक ताणले जाण्याची शक्यता आहे. एकंदरीत, डॉ. विजयकुमार गावित हे जिल्ह्याच्या राजकारणात प्रभावी झाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader vijaykumar gavit control on all important posts in nandurbar district zws
First published on: 21-10-2022 at 01:43 IST