राज्यातील भाजपचे काही मंत्री या निवडणुकीत पराभूत होणार आहेत. यामध्ये राम शिंदे यांचा समावेश असून भाजपच्या अंतर्गत पाहणीत तसे म्हटले असल्याचे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी कर्जत येथे केले.
आघाडीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचाराची सभा येथे झाली. या वेळी महिला अघाडीच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, सुलक्षणा सलगर, मीनाक्षी साळुंके, मंजूषा गुंड, मनीषा सोनमाळी, मोहिनी घुले, माधुरी लोंढे, नगरपंचायतीच्या विरोधी पक्षनेत्या श्रीमती मेहेत्रे, आशा धांडे उपस्थित होते.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजपच्या अंतर्गत पाहणीचा अहवाल फुटला आहेआणि यामध्ये त्यांनी त्यांचे काही मंत्री पराभूत होणार हे सांगितले आहे आणि हे आम्ही म्हणत नाही तर तेच सांगत आहेत. यामुळे कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीत रोहित पवार हे मोठे मताधिक्य घेऊन विजयी होतील असा विश्वास वाटतो.
रोहित पवार म्हणाले, खऱ्या अर्थाने आपल्याला जनतेची सत्ता येथे आणवयाची असून जनतेचा विकास करावयाचा आहे.
टक्केवारीची आणि जातीजातीमध्ये फूट पाडून व गटातटाचे राजकारण प्रत्येक गावामध्ये करून सत्ता मिळवणाऱ्यांना या वेळी धडा शिकवायचा आहे.