राज्यातील ग्राहकांना गेल्या काही महिन्यांपासून येणाऱ्या वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षात बसलेल्या भाजपाने महाविकास आघाडी सरकारला पुन्हा एकदा कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी ग्राहकांना वाढीव वीज बिलातून कोणताही दिलासा मिळणार नाही असं जाहीर केलं होतं. मीटर रिडींगप्रमाणे आलेलं बिल ग्राहकांनी भरलीच पाहिजे असंही राऊत म्हणाले. राज्य सरकारच्या या यु-टर्नवरुन भाजपा आमदार आशिष शेलार यांनी नितीन राऊतांवर निशाणा साधला आहे.

वाचाळवीर मंत्री आधी वीज बिलात सवलत देतो म्हणाले आणि आता शब्द फिरवला. ‘सरासरी’ विचार करुन ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आली त्याचप्रमाणे वीज ग्राहकांसोबतही राज्य सरकारने अशीच बनवाबनी केल्याचंही शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

आणखी वाचा- “मुख्यमंत्र्यांकडे न जाता राज ठाकरे राज्यपालांकडे का गेले हे राऊतांना आता समजलं असेल”

राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार हे अनैतिकतेतून जन्मलेलं असून राज्याला अराजकतेकडे नेणाऱ्या सरकारला जनताच झटका देईल असं मत शेलार यांनी व्यक्त केलं आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यातील अनेक भागांत नागरिकांना अवाच्या सवा बिलं आकारण्यात आली. यावरुन भाजपा, मनसे यासारख्या पक्षांनीही आंदोलन करत सरकारवर टीका केली होती.

आणखी वाचा- राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव बिलातून कुठलाही दिलासा नाही- नितीन राऊत

दरम्यान, वीज वापरणारे हे जसे ग्राहक आहेत तसेच महावितरणही ग्राहक आहे. महावितरणला वीज बाहेरुन विकत घ्यावी लागते. विविध शुल्कही द्यावी लागतात. बिलाचे हप्ते पाडून देण्यात आले आहेत. तसंच पूर्ण बिल एकदम भरणाऱ्यांना सवलतही दिली आहे असंही नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. ग्राहकांना दिलासा मिळावा म्हणून मी पूर्ण प्रयत्न केले. मात्र केंद्र सरकारने यात मदत केली नाही. ६९ टक्के वीज बिल वसुली पूर्ण झाली आहे त्यामुळे आता सवलत देण्याचा विषय बंद झाला आहे. महावितरण ६९ हजार कोटींच्या तोट्यात आहे. आता आम्ही कर्ज काढू शकत नाही असंही नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.