scorecardresearch

औरंगजेबावरील विधानावरून नितेश राणेंची जितेंद्र आव्हाडांवर टीका, ‘उंची किती, वजन किती’चा उल्लेख करत म्हणाले; “आमचा खरा आक्षेप…”

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हे तर स्वराज्यरक्षक होते, असे विधान केले होते.

औरंगजेबावरील विधानावरून नितेश राणेंची जितेंद्र आव्हाडांवर टीका, ‘उंची किती, वजन किती’चा उल्लेख करत म्हणाले; “आमचा खरा आक्षेप…”
लोकसत्ता ग्राफीक्स टीम

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हे तर स्वराज्यरक्षक होते, असे विधान केले होते. या विधानानंतर शिंदे गट आणि भाजपाने आक्रमक पवित्रा धारण केला. हा वाद अद्यापही मागे पडताना दिसत नहाी. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी तर गाड्यांवर ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ असे नाव असलेले स्टिकर लावण्याची मोहीम हाती घेतली हे. कणकवलीपासून त्यांनी ही मोहीम सुरू केली असून हीच मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावरही टीका केली.

“जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाने हिंदू धर्माचा द्वेष केला नाही. तो क्रुर नव्हता, असे विधान केले आहे. औरंगजेबाने कोणतेही हिंदू मंदिर तोडलेले नाही, असे ते म्हणाले होते. त्यानंतर मी आव्हाड यांना पाडलेल्या हिंदू मंदिरांची यादी पाठवली. या यादीनंतर ते कोण नितेश राणे? असे विचारत आहेत,” असे नितेश राणे म्हणाले.

हेही वाचा >>>“…तर मग छत्रपती संभाजी महाराजांवरून टीका कशाला करता?” नितेश राणेंचा विरोधकांना परखड सवाल!

“नितेश राणे यांची उंची किती? त्यांचे वजन किती? हा येथे विषय नाही. मात्र औरंगजेबाला हिरो बनवण्याचा जो प्रयत्न होत आहे, तो खरा मुद्दा आहे. याच मुद्द्यावर आमचा खरा आक्षेप आहे,” अशी भूमिका राणे यांनी मांडली.

“मागील अनेक पिढ्यांपासून आम्ही छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीरच म्हणतो. आमच्या अगोदरच्या पिढीनेही त्यांना धर्मवीरच म्हटलेलं आहे. येणाऱ्या पिढीसाठीही संभाजी महाराज यांची धर्मवीर अशीच ओळख असेल. आता कोणीतरी उठतं. आपली सिरियल चालावी म्हणून ते नवनवीन गोष्टी आणतात. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच होते,” असेही नितेश राणे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-01-2023 at 13:39 IST

संबंधित बातम्या