BJP MLA Parinay Fuke on Prashant Koratkar : छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करणारा आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर हा तेलंगणात लपून बसला होता. पोलिसांनी सोमवारी (२४ मार्च) त्याला अटक केली असून आज त्याला कोल्हापूर न्यायालयात हजर केलं जाणार आहे. तत्पूर्वी भाजपा आमदार परिणय फुके यांनी दावा केला आहे की “प्रशांत कोरटकर हा तेलंगणात एका काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसला होता. तसेच त्याला तिकडे जाण्यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी मदत केली होती.”

परिणय फुके म्हणाले, “प्रशांत कोरटकर याचं संरक्षण काढल्यानंतर चार-पाच दिवसांत त्याला अटक करण्यात आली आहे. तो तेलंगणात काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसला होता. त्यामुळे असं वाटतंय की काँग्रेस त्याला वाचवू पाहतेय. मात्र मी सर्वांना खात्री देतो की आमचं सरकार त्याला कडक शिक्षा करेल.”

आमदार परिणय फुके काय म्हणाले?

परिणय फुके म्हणाले, “प्रशांत कोरटकर हा तेलंगणात काँग्रेस नेत्याच्या घरात सापडला. त्याला काँग्रेसच्या नेत्याने आश्रय दिला होता. माझा आरोप आहे की महाराष्ट्रातील काँग्रेस नेते यात सामील आहेत. इथल्या काही नेत्यांनी सांगितलं की कोरटकरला कोणत्या मार्गाने तेलंगणात नेलं. गडचिरोलीमार्गे त्याला कशा पद्धतीने तेंलगणात नेलं ही माहिती ज्या लोकांनी दिली तेच लोक यात सहभागी आहेत. हे सगळं महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्यासाठी केलं जात आहे. हा काँग्रेसचा प्रयत्न आहे. पक्षाने कोरटकरला एक महिन्यापासून संरक्षण दिलं होतं. महायुतीच्या सरकारला बदनाम करण्याचा त्यांचा कट होता.

आमदार फुके म्हणाले, “कोरटकर हा काँग्रेसशासित राज्यात एका काँग्रेस नेत्याच्या घरात सापडला आहे. यात कोणाचा हात होता हे चौकशित पुढे येईल. त्याचे कॉल रेकॉर्डिंग तपासून आणखी काही सत्य बाहेर येतील. त्यातून महाराष्ट्र काँग्रेसचे नेते समोर येतील.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसचं प्रत्युत्तर

दरम्यान, फुके यांचे दावे काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी खोडून काढले आहेत. वडेट्टीवार म्हणाले, “काँग्रेसचा याच्याशी काहीच संबंध नाही. कोरटकर हे भाजपाचंच पाप आहे. पोलीस कोरटकरला जाऊन भेटले. त्यांना माहिती होतं की कोरटकर कुठे लपला आहे. पोलिसांनी चंद्रपुरात जाऊन त्याची सेवा केली. यावरून स्पष्ट आहे की तो पोलिसांच्या बुरख्याखाली लपून वावरत होता. त्याला महाराष्ट्रद्रोही म्हणून घोषित केलं पाहिजे. त्याला तडीपार केलं पाहिजे. भाजपावाले स्वतःचं पाप लपवायला काँग्रेसचं नाव घेत आहेत. कोरटकरला तेलंगणात आश्रय देणारा भाजपाचाच कार्यकर्ता आहे. आम्ही तिथल्या नेत्यांशी, मंत्र्यांशी चर्चा केली आहे. काँग्रेसचा त्या लोकांशी दुरान्वये संबंध नाही.”