BJP MLA Suresh Dhas Son Sagar’s Car Hits Bike : भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना अहिल्यानगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव फाट्याजवळ घडली. या अपघाताच्या घटनेत दुचाकीस्वार नितीन शेळके हे जागीच ठार झाले. यानंतर सुपा पोलिसांनी आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर सुरेश धस यांच्यासह आणखी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे.
दरम्यान, ही घटना कशी घडली? या घटनेनंतर आतापर्यंत काय कायदेशीर कारवाई करण्यात आली? तसेच विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर आमदार सुरेश धस यांनी यावर आता स्पष्टीकरण दिलं आहे. त्याच बरोबर अपघाताची घटना घडल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आल्याची माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.
सुरेश धस काय म्हणाले?
“माझा मुलगा मुंबईकडे उपचार घेण्यासाठी चालला होता. मुंबईकडे तो रात्री ९ च्या दरम्यान घरून निघाला होता. मात्र, त्यानंतर साडेदहा वाजण्याच्या सुमारास सुपा आणि शिरुरमध्ये असलेल्या जातेगाव फाट्यावर अपघाताची घटना घडली. अपघात झाल्यानंतर माझ्या मुलाने आणि दुचाकीस्वार नितीन शेळके यांच्या भावाने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. पण दुर्देवाने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर तेथील पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे”, असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
“घटना घडल्यानंतर माझ्या मुलाचं आणि गाडीच्या चालकाचे ब्लड सॅम्पल घेण्यात आलेलं आहे. त्यानंतर गुन्हा दाखल होऊन अटकेची कारवाई झालेली आहे. दुर्देवाने अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचा विषय येत नाही. घटना घडल्यानंतर कायदेशीर कारवाई झाली आहे. सुपा पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत. ही घटना घडल्यानंतर माझ्या मुलानेच स्वत: सुपा पोलिसांना घटनेची माहिती दिली होती. त्यानंतर पोलीस काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेची निष्पक्ष चौकशी करायची असेल तरी करावी”, असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.