ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाण प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटताना पाहायला मिळत आहेत. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी बुधवारी आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, सुषमा अंधारे आणि मविआच्या इतर कार्यकर्ते – पदाधिकाऱ्यांनी ठाण्यात मोर्चा काढला. यावेळी भाषणात बोलताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर तोंडसुख घेतलं. त्यावरून आता भाजपा आणि शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येत असून भाजपा नेते मोहित कम्बोज भारतीय यांनी खोचक ट्वीट करत टोला लगावला आहे.
देवेंद्र फडणवीसांवर सुषमा अंधारेंची टीका
सुषमा अंधारेंनी बुधवारी सभेत बोलताना देवेंद्र फडणवीसांवर खोचक शब्दांत टीका केली होती. तसेच, देवेंद्र फडणवीसांच्या “झुकेगा नहीं, घुसेगा” या डायलॉगवरही त्यांनी ट्विटर पोस्टच्या माध्यमातून टोला लगावला होता. “झुकेगा नहीं घुसेगा साला हा डायलॉग भारीच होता. पण २०१६ पासून तुमच्या घरात एक बाई घुसली आणि तुमच्याच पत्नीवर स्पायिंग करत होती. हे तुम्हाला सात वर्षे कळले नाही आणि तुम्ही घुसायच्या बाता कराव्यात हे काही पटत नाही राव”, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं.
सुषमा अंधारेंचं हे ट्वीट व्हायरल होऊ लागलं असताना आता त्यावर मोहित कम्बोज यांनी टोला लगावला आहे. मोहित कम्बोज यांनी सुषमा अंधारेंची तुलना थेट बॉलिवुड अभिनेत्री व मॉडेल राखी सावंत हिच्याशी केली आहे.
काय म्हटलंय ट्वीटमध्ये?
मोहित कम्बोज यांनी केलेल्या ट्वीटमध्ये सुषमा अंधारे सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. “सुषमा अंधारे आणि राखी सावंत या दोन्ही बहिणी आहेत. एक बहीण महाराष्ट्राच्या राजकारणात तर दुसरी बहीण महाराष्ट्राच्या सिनेमामध्ये. दोन्ही बहिणी एकमेकींशी स्पर्धा करत आहेत की रोज सगळ्यात जास्त सनसनाटी कोण निर्माण करेल!” असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
ठाण्यातील राड्यानंतर राजकीय वर्तुळात नेतेमंडळींकडून एकमेकांवर आक्रमकपणे टीका केली जात असताना दोन्ही बाजूंनी एकमेकांवर राजकारणाचा स्तर खालावल्याचा आरोप करत आहेत.
