BJP MP Nishikant Dubey: त्रिभाषा सूत्र आणि इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीचा विरोध सुरू असताना महाराष्ट्रात मराठी विरुद्ध अमराठी असा वाद निर्माण झाला. मुंबईतील मिरा रोड येथे झालेल्या मारहाणीचे पडसाद देशभरात उमटले. यावरून अनेकांनी आपापली मते व्यक्त केली. भाजपाचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे यांनी थेट ठाकरे बंधूंना आवाहन दिले होते. त्यांच्या विधानानंतर महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्याच्या अर्थव्यवस्थेवर दुबे यांनी केलेल्या विधानाबाबत नाराजी व्यक्त करत आपली असहमती व्यक्त केली. यानंतर आता खासदार निशिकांत दुबे यांनी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी नरमाईचा सूर अवलंबला असला तरी ठाकरे बंधूंना मात्र पुन्हा लक्ष्य केले.
“देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत महाराष्ट्राचे खूप मोठे योगदान आहे. मराठी भाषेप्रमाणे दक्षिणेतील सर्वच भाषांचा आम्ही सन्मान ठेवतो. त्यांचे जसे स्वतःच्या भाषेवर प्रेम आहे. त्याप्रमाणेच बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड आणि राजस्थानच्या लोकांनाही त्यांची भाषा प्रिय आहे. भाषेच्या आधारावर ठाकरे कुटुंबिय जर मारझोड करत असतील तर हे चुकीचे आहे”, अशी प्रतिक्रिया निशिकांत दुबे यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
तसेच माझे दुसरे विधान चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आले, असे ते म्हणाले. निशिकांत दुबे पुढे म्हणाले, “महाराष्ट्राचे देशाच्या अर्थव्यवस्थेत खूप मोठे योगदान आहे. याला कुणीही नाकारू शकत नाही. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला. मुंबई किंवा महाराष्ट्रातून जो कर भरला जातो, त्यात आमच्या लोकांचाही खूप मोठा वाटा आहे. याचा संबंध ठाकरे परिवाराशी नाही. स्टेट बँक ऑफ इंडिया जर कर भरत असेल तर त्याचे कारण त्यांचे मुख्यालय मुंबईत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये देशभरातील नागरिकांचे खाती आहेत. तसेच एलआयसीचे मुख्यालयही मुंबईत आहे.”
गरीबांना का मारझोड करता?
मराठी भाषेच्या कारणावरून झालेल्या मारहाणीबद्दल बोलताना निशिकांत दुबे म्हणाले, “मराठी येत नाही म्हणून गरीबांनाच मारले जाते. मुंबईत मुकेश अंबानी राहतात. ते मराठी कमी बोलतात, तुमच्यात हिंमत असेल तर त्यांच्याकडे जाऊन दाखवा. माहिममध्ये सर्व मुस्लीम आहेत, तिथे जाऊन दाखवा. एसबीआय बँकेचा अध्यक्ष मराठी बोलत नाही, एलआयसीचा अध्यक्षाला मारझोड करून दाखवा.”
पटक पटक के मारेंगे – दुबे
“जो गरीब माणूस महाराष्ट्रात पोट भरण्यासाठी गेला आहे. त्यालाच मारझोड केली जाते. यांचेही महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत योगदान आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना असे वाटत असेल की दहशतीच्या जोरावर ते राजकारण करू इच्छित असतील तर ते होणार नाही. जर तुम्ही असे करणार असाल तर तुम्ही तमिळनाडू, कर्नाटक किंवा केरळ या राज्यात जाल, तिथले लोक तुम्हाला मारतील, हे मी बोललो होतो. त्यावर मी ठाम आहे”, असेही खासदार दुबे म्हणाले. यावेळी त्यांनी हिंदीत ‘पटक पटक के मारेंगे’ या वाक्याचा पुर्नउच्चार करत आपल्या विधानावर ठाम असल्याचे म्हटले.