गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे. शिंदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आणि उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं. त्याआधी अडीच वर्षांपूर्वी शिवसेना-भाजपा युती तुटली आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेनं महाविकास आघाडीचा अभूतपूर्व असा प्रयोग राज्यात केला. मविआचं सरकार अस्तित्वात आलं. तेव्हापासून यासंदर्भात घडलेल्या अनेक घडामोडींबाबत वेगवेगळे दावे वेळोवेळी केले जातात. यासंदर्भात आता नारायण राणेंनीही एक दावा केला असून त्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
२०१९ साली राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांसह केलेला शपथविधी अजूनही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतो. त्याचप्रमाणे २०१९ साली शिवसेना-भाजपामधील मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा, तुटलेली युती, मविआची स्थापना, जागावाटप, मंत्रीमंडळ विस्तार अशा अनेक घटनांचीही चर्चा होत असते. शिवसेना-भाजपा युती तुटण्यासाठी मुख्यमंत्रीपद कारणीभूत ठरल्याचं आता सभांमधून सांगितलं जात आहे. मात्र, त्याहीआधी आपण भाजपाला उद्धव ठाकरेंशी युती न करण्याचा सल्ला दिला होता, असं नारायण राणे म्हणाले आहेत.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंवर परखड शब्दांत हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा ‘फडतूस’ असा उल्लेख केला असताना त्यावर आक्षेप घेत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना ‘महाफडतूस’ म्हणत टीका केली. तसेच, २०१९ साली मीच देवेंद्र फडणवीसांना युती न करण्याचा सल्ला दिला होता, असा दावा नारायण राणेंनी केला आहे.
“गुंडांचं सरकार महाराष्ट्रात राहू देणार नाही..” आदित्य ठाकरेंची ठाण्यात गर्जना
काय म्हणाले नारायण राणे?
“पाच वर्षं देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. विरोधी पक्षनेता होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होते. भाजपानं २०१४ साली जर उद्धव ठाकरेंना आधार दिला नसता, युती झाली नसती तर त्यांचे आमदार काही निवडून आले नसते. ते सत्तेत आले नसते. २०१९लाही मी देवेंद्र फडणवीसांना सांगत होतो की युती करू नका. सगळं संपलंय त्यांचं. काही कामाचं नाही”, असं नारायण राणे म्हणाले.
“मी असतो, तर रोशनी शिंदेंना…”
दरम्यान, ठाण्यात शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केलेल्या ठाकरे गटाच्या रोशनी शिंदेंना उद्धव ठाकरे सपत्नीक भेटायला गेल्यावरूनही राणेंनी टीका केली. “रोशनी शिंदे मोदींवर बोलतात, देवेंद्र फडणवीसांवर बोलतात. औकात आहे का? मी त्यांना बोलवून समजावलं असतं. बाई तू हे बोलू नकोस. तिला दम दिला असता. पण हे उलट तिची बाजू घेऊन ठाण्याला गेले. कुठल्या सैनिकासाठी कधी गेले नाहीत. सपत्नीक नाही किंवा कुटुंबही घेऊन नाही गेले”, असं नारायण राणे म्हणाले.
राज ठाकरे उद्धव ठाकरेंना पर्याय ठरू शकतील का? चंद्रशेखर बावनकुळेंचं थेट विधान
“ते कुटुंब का घेऊन जातात मला माहिती आहे. एकटे जाऊ शकत नाहीत. चालू शकत नाहीत. परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे ताबा सुटला आहे. सत्ता गेली, मुख्यमंत्रीपद गेलंय. आयुष्यात शिवसेना, उद्धव ठाकरेंना ते पद कधीच मिळणार नाही. आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेस मदत म्हणून सोबत ठेवतायत. स्पेशल खुर्ची वगैरे सांगतात. पण त्या खुर्चीशिवाय हे बसू शकत नाहीत. मागून टेकू लावाला लागतो. स्टेंट टाकल्यामुळे हे बसू शकत नाहीत. त्यामुळे जिथे मीटिंग तिथे ती खुर्ची घेऊन जावी लागते. लोकांना वाटतं सिंहासन चाललंय”, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.