महाराष्ट्रातल्या सत्तापेचावर अमित शाह यांचं मोठं  वक्तव्य समोर आलं आहे. महायुतीचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील असं निवडणुकीपूर्वीच सांगण्यात आलं आहे. मात्र निवडणूक निकालानंतर शिवसेना नव्या मागण्या घेऊन समोर आली असा आरोप अमित शाह यांनी केला. शिवसेनेसोबत मुख्यमंत्रीपद वाटून घेऊ असं काहीही ठरलेलं नव्हतं असंही अमित शाह यांनी स्पष्ट केलं. पुढचे मुख्यमंत्री फडणवीसच असतील हे निवडणुकीच्या आधीच स्पष्ट झालं होतं असंही त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातल्या सत्तापेचावर अमित शाह यांनी पहिल्यांदाच हे वक्तव्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विरोधक राज्यपालांनी वेळ दिला नाही हे विरोधकांचं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. आम्ही शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यासाठी तयार होतो मात्र त्यांनी साथ सोडली. महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील हे मी भाषणांमध्ये अनेकदा बोललो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा त्यांच्या सभांमधून हेच सांगितलं. देवेंद्र फडणवीसही सांगत होते त्यावेळी कोणीही आक्षेप घेतला नाही. निवडणूक निकाल लागल्यानंतर शिवसेनेने अटी बदलल्या. त्यांच्या नव्या अटी आम्हाला मान्य नाहीत असंही अमित शाह यांनी स्पष्ट केलं. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

एवढंच नाही तर बंद दाराआड शिवसेनेशी काय चर्चा झाली ते सांगणं मला योग्य वाटत नाही कारण माझ्या पक्षाचा माझ्यावर तसा संस्कार नाही असं म्हणत त्यांनी शिवसेनेला नेमकं काय वचन दिलं होतं ते सांगणं टाळलं. आम्ही शिवसेनेचा कोणताही विश्वासघात केलेला नाही तर शिवसेनेने आमची साथ सोडली असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंसोबत काय बोलणं हे अमित शाह यांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यावर महाराष्ट्रातले विरोधक टीका करत आहेत की आम्हाला पुरेसा वेळ दिला नाही त्याला काहीही अर्थ नाही ते फक्त राजकारण करत आहेत असाही आरोप शाह यांनी केला. वेळ दिला नाही, संधी दिली नाही याला काहीही अर्थ नाही कारण विरोधीपक्ष यावर राजकारण करत आहेत. १८ दिवस सत्तास्थापनेसाठी कुठेही लागलेले नाही. आता राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करुन सहा महिन्यांचा अवधी दिला आहे. ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांनी जावं आणि सरकार स्थापन करावं असाही टोला अमित शाह यांनी लगावला.

राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू केली नसती तर आमच्यावर हा आरोप झाला असता की भाजपाला काळजीवाहू सरकार चालवयाचं आहे. राज्यपालांनी प्रत्येक पक्षाला संधी दिली. मात्र एकही पक्ष त्या संधीचा उपयोग करुन सत्तेचा दावा सिद्ध करु शकला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला रात्री ८.३० पर्यंत वेळ देण्यात आली होती. मात्र त्यांनी सकाळी ११ च्या दरम्यान राज्यपालांना फोन करुन मुदतवाढ मागितली. राज्यपालांनी त्यानंतर राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली कारण राज्यात पेच निर्माण झाला होता. राज्यपालांचं काही चुकलं आहे असं मुळीच वाटत नाही असंही अमित शाह यांनी स्पष्ट केलं.

मध्यावधी निवडणूक महाराष्ट्रात व्हावी असं मुळीच वाटत नाही. मात्र आता सहा महिने आहेत विरोधक जी बोंब ठोकत आहेत की आम्हाला संधीच दिली नाही त्याला काही अर्थ नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp national president amit shah speaks to ani on maharashtra political situation scj
First published on: 13-11-2019 at 19:06 IST