Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु असून अनेक दिग्गज लढतींकडे लक्ष आहे. यामधील एक महत्त्वाची लढत म्हणजे नितेश राणे.. नितेश राणे यांना भाजपाकडून कणकणवलीमधून उमेदवारी देण्यात आली होती. भाजपाचा हा विश्वास सार्थ ठरवत नितेश राणे विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या सतीश सावंत यांचा पराभव केला.
महाराष्ट्रात युती होऊनही शिवसेनेने कणकवलीत स्वत:चा वेगळा उमेदवार उभा केला होता, पण त्यांचा उमेदवार विजयी होऊ शकला नाही. कधीकाळी नारायण राणे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे सतीश सावंत यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला होता. पण युतीच्या जागावाटपांमध्ये कणकवलीचा जागा भाजपाककडे गेली. त्यामुळे काही नाराज शिवसैनिकांनी सेनेकडून सतीश सावंत यांना उमेदवारीचा हट्ट धरला. मात्र सेनेचा हा मनसुबा यशस्वी ठरू शकला नाही.
सुरुवातीच्या फेरीपासूनच मतमोजणीत नितेश राणे यांनी आघाडी घेतली होती. ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी नितेश राणे मोठ्या फरकाने विजयी होईल असा विश्वास अनेकदा व्यक्त केला होता. तसेच नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे यांनी ८० टक्के मत आपल्याला मिळतील, असा दावा केला होता.
दरम्यान, शिवसेना – भाजपाच्या महायुतीत वादग्रस्त ठरलेल्या जागेपैकी एक म्हणजे कणकवली मतदरासंघ होता. भाजपाने नितेश राणे यांना उमेदवारी दिली असली, तरी शिवसेनेकडून आपला उमेदवार देण्यात आला होता. नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेनेने सतीश सावंत यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे ही निवडणूक शिवसेना विरुद्द भाजपा अशी रंगली होती. या व्यतिरिक्त कणकवलीत काँग्रेसकडून सुशील राणे यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर मनसेकडून राजन दाभोळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती.