शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर थेट टीका केली आहे. गीते यांच्या या विधानामुळे महाविकासआघाडी सरकारमधील वाद पेटण्याची शक्यता आहे. “राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला असून शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत”, असं गीते म्हणाले आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता भाजपाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

“मी काही शरद पवारांचा दुश्मन नाही. मी फक्त मुद्द्यांवर बोलत आलो आहे. शरद पवारांनी राज्यात गेली ५० वर्षे नेतृत्त्व केलं आहे. त्यामुळे, मी नेहमीच मुद्द्यावर बोलत होतो. पवार आणि माझा वैयक्तिक वाद नाही. पण आता अनेक लोकं आपली खरी भूमिका मांडायला लागले आहेत. ही बाब स्वागतार्ह आहे. या मुद्द्यांचा महाराष्ट्रातील जनतेनेसुद्धा विचार करणं गरजेचं आहे”, अशी प्रतिक्रिया गोपीचंद पडळकर यांनी अनंत गीते यांच्या शरद पवारांवरील टीकेवर दिली आहे.

गोपीचंद पडळकर हे नेहमीच पवारांवर बोचऱ्या टीका करत असतात. त्यामुळे, शिवसेनेच्या नेत्याकडून आपलाच मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षांवर टीका झाल्यानंतर पडळकर यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावेळी पवारांना टोला लगावत पडळकर म्हणाले की, “आता अनेक लोकं आपली खरी भूमिका मांडायला लागले आहेत. ही स्वागतार्ह बाब आहे.”

अनंत गीते काय म्हणाले?

”काँग्रेस सुद्धा काँग्रेस आहे, राष्ट्रवादी सुद्धा काँग्रेस आहे, तरी एकमेकांचे तोंड बघत होते का? एकमेकांचे कधी जमत होते का? यांचा विचार एक आहे का? दोन काँग्रेस एक विचारांची होऊ शकत नाही तर शिवसेना ही काँग्रेस विचारांची कदापि होऊ शकणार नाही. मुळात राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. दुसरा कुठलाही नेता, त्याला जगाने कितीही उपाध्या देवोत, त्याला कोणी जाणता राजा म्हणो, पण आमचा गुरु तो होऊ शकत नाही, आमचे गुरु फक्त बाळासाहेर ठाकरे. महाविकास आघाडी ही सत्तेची तडतोड आहे”, असं वक्तव्य अनंत गीते यांनी केलं आहे.