गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात उलथापालथ होत असल्याचं दिसत आहे. सोमवारी विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये सुंदोपसुंदी सुरू झाली. त्यात मंगळवारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनीच आमदारांचा मोठा गट घेऊन थेट सुरत गाठल्यामुळे राजकीय भूकंप झाला. या पार्श्वभूमीवर सरकार दोलायमान स्थितीत असताना भाजपा पुन्हा सरकार स्थापन करणार असल्याचे दावे केले जात आहेत. त्यात एकनाथ शिंदेंनी भाजपासोबत सरकार स्थापन करण्याची गळ उद्धव ठाकरेंना घातल्याचं देखील सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात निर्माण झालेल्या परिस्थितीचे पडसाद बीडमध्ये झालेल्या पंकजा मुंडेंच्या सभेमध्ये उमटल्याचं पाहायला मिळालं.

…आणि पंकजा मुंडे खळखळून हसू लागल्या!

कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीनंतर स्टेजवर बसलेल्या पंकजा मुंडे खळखळून हसू लागल्याचं दिसलं. बीडच्या आष्टी येथे आयोजित केलेल्या भाजपा कार्यकर्ता मेळाव्याच्या जाहीर कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडें समोर “पंकजाताई भावी मुख्यमंत्री. पंकजाताईला मुख्यमंत्री करा”, अशा घोषणा दिल्या. पण घोषणा होताच लागलीच इतर काही कार्यकर्त्यांनी पुन्हा या घोषणा थांबवल्या. हा सगळा प्रकार पाहाताच पंकजा मुंडे खळखळून हसायला लागल्या. “कार्यकर्त्यांच्या अपेक्षांमुळे माझी डोकेदुखी होते”, असं म्हणत पंकजा मुंडेंनी मिश्किल टिप्पणी केली आहे.

“मी बघत होते की लोक कशी घोषणा देत आहेत. आमचा एक उत्साही कार्यकर्ता उठून त्यानं एक घोषणा दिली. पण ती घोषणा दिल्याबरोबर बाकी सगळे एकत्र म्हणाले, गप रे. मी म्हटलं आत्ता यांना माझी खरी काळजी वाटायला लागली आहे. त्यांच्या लक्षात आलं आहे की आपलं ताईंवर जे प्रेम आहे, त्याचं कधीकधी आपण अघोरी प्रदर्शन करतो”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकनाथ शिंदे प्रकरणावर सावध भूमिका

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी एकनाथ शिंदे प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सावध प्रतिक्रिया दिली आहे. “मी काल दिवसभर टीव्हीही बघितला नाही. यासंदर्भात तुम्हाला जेवढी माहिती आहे तेवढीच मला आहे. त्यामुळे त्यावर मी प्रतिक्रिया देणं उचित ठरणार नाही”, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.