सोलापुरात परिचारक यांच्यापुढे आमदारकी राखण्याचे आव्हान

राष्ट्रवादीने २०१० साली रणजितसिंह यांचा पत्ता कापून सांगोल्याचे दीपक साळुंखे यांना संधी देत विधान परिषदेत निवडून पाठविले होते.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ

एजाज हुसेन मुजावर, लोकसत्ता

सोलापूर : विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक कधी होईल याबाबत अनिश्चितता असली तरी ही निवडणूक वेळेत व्हावी म्हणून मावळते नगरसेवक देव पाण्यात घालून बसले आहेत. दुसरीकडे, आमदारकी कायम राखण्याचे भाजपचे प्रशांत परिचारक यांच्यापुढे आव्हान असताना, महाविकास आघाडीकडून तगडय़ा उमेदवाराची चाचपणी के ली जात आहे.

एकूण मतदारांच्या संख्येपैकी ७५ टक्के  मतदार मतदान करू शकत असतील तरच निवडणूक नियोजित वेळेत म्हणजे डिसेंबरमध्ये होईल. अन्यथा ही निवडणूक महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्यावर होऊ शकते. जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार, ७५ टक्के  मतदानास पात्र ठरत नाहीत. तरीही अंतिम निर्णय येत्या ८ ते १० दिवसांत होणार आहे. पालिकांच्या निवडणुकांनंतर विधान परिषदेची निवडणूक झाल्यास राजकीय चित्र बदललेले असेल. तसेच विद्यमान नगरसेवकांना ‘लक्ष्मीदर्शन’ होणार नाही.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकत्याच झालेल्या भेटीत सोलापूरच्या आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आमदार प्रशांत परिचारक यांना पुन्हा उमेदवारी देण्याचे जाहीर करीत ही जागा कायम राखण्याची जबाबदारी माजी पालकमंत्री, आमदार विजय देशमुख व इतरांवर निश्चित केली आहे. सोलापूर महापालिका भाजपच्या वर्चस्वाखाली आहे. तर जिल्हा परिषदेतही भाजप पुरस्कृत समविचारी मंडळींची सत्ता आहे.

या अगोदर बडे कंत्राटदार म्हणून ओळख राहिलेल्या माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी १९९७ साली सोलापूरच्या विधान परिषद निवडणुकीत ‘अर्थ’पूर्ण चमत्कार घडवून स्वत:चा ‘देशमुख पॅटर्न’ निर्माण करीत आमदारकी पदरात पाडली होती. त्या वेळी तत्कालीन शरदनिष्ठ काँग्रेसचे आमदार युन्नूसभाई शेख यांचा पराभव झाला होता. नंतर २००३-०४ साली विजयसिंह मोहिते-पाटील यांचा मोठा राजकीय दबदबा असताना त्यांचे पुत्र रणजितसिंह हे याच मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेवर प्रथमच निवडून गेले होते. एव्हाना, शरद पवार व विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यात सुप्त राजकीय संघर्ष वाढला होता. नंतर राष्ट्रवादीने २०१० साली रणजितसिंह यांचा पत्ता कापून सांगोल्याचे दीपक साळुंखे यांना संधी देत विधान परिषदेत निवडून पाठविले होते.

 पुढे २०१६ सालच्या निवडणुकीत दीपक साळुंखे यांना पुनश्च विधान परिषदेवर राहण्यासाठी दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली असता त्या वेळी भाजपपुरस्कृत अपक्ष उमेदवार प्रशांत परिचारक यांनी आव्हान दिले होते. पवार काका-पुतण्याशी जवळीक असलेले पंढरपूरचे दिवंगत ज्येष्ठ सहकार नेते सुधाकरपंत परिचारक यांचे पुतणे प्रशांत परिचारक यांच्यासाठी पवारनिष्ठ असूनही वरकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात आणि आतून मोहिते-पाटील यांच्या विरोधात राजकीय भूमिका घेतलेले माढय़ाचे संजय शिंदे (सध्याचे करमाळ्याचे राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष आमदार) यांनी प्रशांत परिचारक यांच्या बाजूने उघडपणे सूत्रे हाताळली होती. यात मोठा ‘घोडेबाजार’ होऊन राष्ट्रवादीची मते फोडत परिचारक यांच्याकडून साळुंखे यांचा १२१ मतांनी पराभव केला होता.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्य़ात २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली. पवार काका-पुतण्याच्या विरोधात मोहिते-पाटील यांनी राजकीय निर्णय घेत थेट भाजपमध्ये प्रवेश केला. सद्य:स्थितीत जिल्ह्य़ात भाजपचे दोन खासदार व आठ आमदार असल्यामुळे भाजपचे प्राबल्य आणखी वाढले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp prashant paricharak face challenge to retain the mla position zws