राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोविड केअर सेंटरला सोमवारी भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील रुग्णांसोबत झिंगाट गाण्यावर डान्सदेखील केला. दरम्यान यावेळी त्यांनी करोनाच्या नियमांचं पालन केलं नसल्याचा आरोप करत विरोधकांनी निशाणा साधला आहे. “शरद पवार यांचे नातू आहेत म्हणून रोहित पवारांना दुसरा न्याय का?,” असा सवाल विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विचारला आहे.
नेमकं काय झालंय –
कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार व कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथे कोविड सेंटर उभारण्यात आलं आहे. रोहित पवार यांनी या कोविड सेंटरला सोमवारी भेट दिली. यावेळी रुग्णांशी संवाद साधत त्यांनी रुग्णांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
रुग्णांचे मनोबल वाढावे तसेच त्यांना मनोरंजन म्हणून गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘झिंगाट’ गाण्यावर तिथल्या आजींनीही ठेका धरला आणि रोहित पवारही त्यात सहभागी झाले.
VIDEO: रोहित पवारांचा कोविड सेंटरमध्ये सैराटमधल्या ‘झिंगाट’ गाण्यावर डान्स@RRPSpeaks @NCPspeaks @MumbaiNCP pic.twitter.com/0rKfQth6bc
— LoksattaLive (@LoksattaLive) May 25, 2021
रोहित पवार यांना पाठीशी घातल जातयं का?
“रोहित पवार यांनी एका कोविड सेंटरवर जाऊन कोविड प्रोटोकॉलचा भंग केला, हे निषेधार्ह आहे. त्या ठिकाणी ते पीपीई किट न घालता गेले, रुग्णांमध्ये मिसळले, डान्स केला. त्यामुळे ते ‘सुपर स्प्रेडर’ ठरु शकतात. सर्वसामान्य नागरिकांना एक न्याय आणि रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत म्हणून त्यांना वेगळा न्याय दिला जाऊ शकतो का? कुणीही लोकप्रतिनिधी असो किंवा मोठा नेता, त्यांनी करोना नियमांच गांभीर्य आणि भान ठेवलंच पाहिजे, अशी अपेक्षा आहे,” असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
रोहित पवारांचं उत्तर –
दरम्यान प्रवीण दरेकर यांच्या टीकेला रोहित पवारांनीही उत्तर दिलं आहे. रोहित पवार यांनी ट्विट केलं असून ते म्हणाले आहेत की, “सन्माननीय प्रवीण दरेकर साहेब कोविड सेंटरमधली माणसं माझ्या कुटुंबातली असून त्यांच्यासाठी कितीही केलं तरी ते कमी आहे. त्यामुळं शक्य ते सगळं करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. अगदी पहिल्या दिवसापासून मी त्यांची काळजी घेतो. त्यांना काल एकच दिवस भेटलो असं नाही तर नेहमीच भेटतो”.
VIDEO:…जेव्हा रोहित पवार कोविड सेंटरमध्ये सैराटमधल्या ‘झिंगाट’ गाण्यावर थिरकतात
“माझ्या मतदारसंघातले अधिकारी आणि नागरिकही या रुग्णांची जमेल तशी सेवा करतात. कोविडमुळं खचलेल्या रुग्णांना माझ्या भेटीमुळं धीर येत असेल, त्यांच्या आनंदात दोन मिनिटं सहभागी झाल्याने तो द्विगुणित होत असेल तर त्यात गैर काय? त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच माझ्यासाठी आनंद आहे,” असंही ते म्हणाले आहेत.
माझ्या मतदारसंघातले अधिकारी आणि नागरिकही या रुग्णांची जमेल तशी सेवा करतात. कोविडमुळं खचलेल्या रुग्णांना माझ्या भेटीमुळं धीर येत असेल, त्यांच्या आनंदात दोन मिनिटं सहभागी झाल्याने तो द्विगुणित होत असेल तर त्यात गैर काय? त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच माझ्यासाठी आनंद आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 25, 2021
“५ वी नापास झालेल्या गुजरातमधल्या एका आमदारासारखं मी रुग्णाला इंजेक्शन दिलं नाही. तसंच आपल्याही पक्षाचे अनेक नेते पीपीई किटशिवाय रुग्णांना भेटले, तेंव्हा त्यांच्या निदर्शनास आपण ही गोष्ट आणून दिल्याचंही काही दिसलं नाही! असं का?,” अशी विचारणाही त्यांनी केली आहे.
आणि हो… ५ वी नापास झालेल्या गुजरातमधल्या एका आमदारासारखं मी रुग्णाला इंजेक्शन दिलं नाही. तसंच आपल्याही पक्षाचे अनेक नेते पीपीई किटशिवाय रुग्णांना भेटले, तेंव्हा त्यांच्या निदर्शनास आपण ही गोष्ट आणून दिल्याचंही काही दिसलं नाही! असं का?
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 25, 2021
रोहित पवारांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सोमवारी राज्यात करोनाचे २२ हजार १२२ नवे रुग्ण आढळले असून ३६१ जणांचा मृत्यू झाला आहे.