औरंगाबादमध्ये एका भूमिपूजनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यात जुगलबंदी झाल्याचं पहायला मिळालं. रावसाहेब दानवे यांनी निजाममुळेच मराठवाड्यात रेल्वेचं नेटवर्क नाही असं सांगत जलील यांच्या मागणीवर उतर दिलं. तसंच औरंगाबाद नव्हे तर संभाजीनगरसाठी मागण्या करा, असा टोलाही लगावला. त्यांच्या या विधानावर जलील यांनीही उत्तर देत देण्यासाठी काहाही ठोस नसल्याने निजाम आठवत आहे असं म्हटलं.

काय म्हणाले रावसाहेब दानवे –

“मी इम्तियाज जलील यांच्या मताशी सहमत आहे. मराठवड्यात रेल्वेचं नेटवर्क नाही याचं मुख्य कारण म्हणजे आम्ही ब्रिटीश नाही, तर निजामच्या अधिपत्याखाली होतो. निजाम होता म्हणूनच आपण मागासलेलो आहोत. कारण त्याला रेल्वेची गरज नव्हती. पण आता मोदींच सरकार असून, मराठवाड्यातील नेटवर्कमध्ये वाढ होईल असं मी आश्वासन देतो,” असं रावसाहेब दानवे म्हणाले.

हेही वाचा – गोव्यावरुन दारुची एक बाटली जरी आणली तर…; शिंदे सरकारचा मद्यप्रेमींना इशारा

पुढे ते म्हणाले की “तुम्ही माझे फार चांगले मित्र आहात. विरोधी पक्षातले आहेत, पण मैत्री पक्की आहे. मी तर सर्वांना सांगत असतो की ते एमआयएमचे आहेत, पण भाजपाचे वाटत आहेत. तुम्ही छत्रपती संभाजीनगरसाठी मागणी करायला हवी होती, पण औरंगाबदसाठी करत आहात”.

इम्तियाज जलील यांचं उत्तर –

“जेव्हा तुमच्याकडे देण्यासाठी आणि बोलण्यासाठी काही ठोस नसतं, तेव्हा निजामची आठवण होते. देण्यासाठी काहीच नसल्याने मी छत्रपती संभाजीनगरसाठी आणि तुम्ही औरंगाबदसाठी मागत आहात असं म्हणत आहेत. किमान तुम्ही संभाजीनगरसाठी काय घोषणा करणार आहात ते तरी सांगा,” अशी टीका जलील यांनी केली.

“मी एमआयएमचा आहे आणि राहणार असून यांच्यावर नजर ठेवणार आहे,” असं सांगत त्यांनी दानवेंना उत्तरही दिलं. भाजपात जाण्याच्या चर्चांसंबंधी विचारलं असता त्यांनी “इतका मोठा गुन्हा आणि पाप मी करणार नाही,” असं त्यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“केंद्रीय रेल्वेमंत्री येतात तेव्हा त्यांनी अधिकाऱ्यांना आपण काय करु शकतो यासंबंधी विचारणा करणं अपेक्षित असतं. पण ते न करता मोदींसोबत आमची बैठक झाली, अडीच तास त्यांनी आमचं म्हणणं ऐकलं, रात्री ११ वाजता फोन केला सांगत होते. ५० वर्षांचं स्वप्न दाखवू नका, आज काय देणार आहात ते सांगा,” अशी टीकाही त्यांनी केली. विकासाच्या मुद्दयावर आम्ही सर्वांची साथ देण्यास तयार आहोत असंही ते म्हणाले.