महापालिकेच्या अंदाजपत्रकाविषयी पर्यायाने शहर विकासाबाबत महापौरांना गांभीर्य नाही, चर्चा टाळण्यासाठीच वेळ दिला जात नाही, असा आरोप करत भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीच्या नगरसेवकांनी रविवारी सभात्याग केला. आजची सभा तहकूब करून मंगळवारी सभा ठेवावी अशी युतीच्या नगरसेवकांची मागणी होती.
मनपाचे अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर शनिवारी ही सभा तहकूब करण्यात आली होती. त्यावर चर्चेसाठी रविवारी सभा सुटीच्या दिवशी ठेवण्यात आली होती. सुमारे अर्ध्या तासाच्या विलंबाने सुरू झालेल्या सभेस युतीचे नगरसेवक एकत्रित, परंतु ब-याच विलंबाने सभेला आले. सुरुवातीलाच अभय आगरकर यांनी ६०० कोटींच्या बजेटमधील तरतुदींचा अभ्यास करण्यासाठी, माहिती घेण्यासाठी वेळ मिळावा, लोकशाहीत विरोधी पक्षांना त्यांची भूमिका मांडण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे, त्यामुळे सभा मंगळवारी ठेवावी, अशी मागणी करतानाच त्यांनी महापौरांना सोमवारी पक्षाची बैठक असल्यानेच त्यांनी रविवारी सभा बोलावल्याचा आरोप केला. मात्र महापौर संग्राम जगताप यांनी सभेत राजकीय विषय करू नका, असे त्यांना स्पष्ट केले.
या विषयावरून आगरकर व किशोर डागवाले यांच्यामध्येही बरीच शाब्दिक चकमक रंगली. स्थायी समितीला चर्चेसाठी अनेक दिवसांचा अवधी दिला गेला, तसा तो आम्हालाही मिळावा, अशी आगरकर यांची मागणी होती. अनिल शिंदे यांनीही सभा मंगळवारी घेण्याची सूचना केली, त्याला छाया तिवारी यांनी पाठिंबा दिला. चर्चा चार दिवस चालवा, ज्या विषयाची माहिती मिळणार नाही, तो विषय तहकूब ठेवावा, परंतु सध्याची सभा सुरू ठेवावी, असे डागवाले यांनी सांगितले.
तरतुदींचा अभ्यास करण्यासाठी वेळ देण्याचा व्यावहारिकपणा दाखवला जात नाही, यातून महापौर शहर विकासाच्या दृष्टीने संवेदनशील नाहीत, हेच स्पष्ट होते. अंदाजपत्रकातून शहराच्या विकासाची स्वप्नपूर्ती होत असते. महापौर त्यासाठी गंभीर आहेत, हे दिसत नाहीत, असा आरोप करत आगरकर यांनी सभात्यागाची घोषणा केली. महापौरांच्या वतीने दीप चव्हाण यांनी युतीच्या सदस्यांना सभात्याग न करण्याची विनंती केली, मात्र युतीचे नगरसेवक निघून गेले. जाताना बाळासाहेब बोराटे, डागवाले, कैलास गिरवले यांनी त्यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला, त्याला युतीच्या सदस्यांनीही प्रत्युत्तर दिले.
नगरसेवक आपसात भांडतात, त्यात अधिका-यांचे दोन मांजरांतील भांडणासारखे फावते, अधिकारी गैरफायदा घेतात, याकडे नज्जू पहेलवान यांनी लक्ष वेधले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp shiv sena corporators meeting sacrifice
First published on: 07-07-2014 at 03:25 IST