भाजप-सेनेकडून संयुक्त पत्रकाद्वारे घोषणा; जागावाटपाची मात्र प्रतीक्षा

मुंबई : भाजप-शिवसेना आणि अन्य घटकपक्ष महायुती म्हणूनच आगामी निवडणुकीस सामोरे जातील, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी सोमवारी संध्याकाळी एका संयुक्त पत्रकाद्वारे केली. मात्र महायुतीतील जागावाटपाची प्रतीक्षा कायम आहे.

सेना-भाजपचे जागावाटप जवळपास पूर्ण झाले असून, कोणता पक्ष किती व कोणत्या जागा लढविणार त्याचा तपशीलही लवकरच जाहीर केला जाईल, असे या पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले. दरम्यान, शिवसेनेने उमेदवारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केल्याने ‘मातोश्री’च्या परिसरात संध्याकाळपासूनच आनंद आणि नाराजीचे सूर उमटू लागले होते. वरळी मतदारसंघातून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपली उमेदवारी जाहीर केली असली, तरी त्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याबाबत काहीही ठरलेले नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले, तर चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी मिळणार, अशी चर्चा सुरू होताच भाजपच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांच्या समर्थकांच्या नाराजीस पक्षश्रेष्ठींना सामोरे जावे लागले.

महायुतीतील जागावाटप आणि भाजपचे उमेदवार ठरविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत रविवारी नवी दिल्लीत बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष पाटील या बैठकीस उपस्थित होते. शिवसेनेला १२४ जागा आणि घटकपक्षांना १८ जागा देऊन भाजप १४६ जागा लढवेल, असे सूत्र ठरल्याचे सूत्रांकडून समजते. भाजपने पाठविलेले पाच उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर लढतील व शिवसेनेचीही त्यास तयारी असल्याचे या सूत्रांनी सांगितले. याबाबत  अधिकृत तपशील लवकरच जाहीर केला जाईल, असे पाटील यांनी सांगितले.

महायुतीमध्ये रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम पक्ष आदींचा समावेश असून जागावाटप जवळपास पूर्ण झाले आहे. शिवसेना उपमुख्यमंत्रीपदासाठी आग्रही आहे. शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी याबाबत वक्तव्य केले आहे, यासंदर्भात विचारता पाटील म्हणाले, पक्षासाठी मत मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. भाजपची उमेदवार यादी तयार असून ती नवी दिल्लीतून जाहीर होईल, सर्व उमेदवारांना पक्षाचे अधिकृत एबी अर्ज पोहोचविण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.

राज्यात पाच वर्षे यशस्वीपणे राज्य कारभार करीत महायुती सरकारने महाराष्ट्राला एक नव्या उंचीवर नेऊन ठेवले असून लोकशाही परंपरेप्रमाणे आता पुन्हा आम्ही एकत्रितपणे निवडणुकीस सामोरे जात आहोत, असे महायुतीच्या घोषणेसंदर्भातील संयुक्त पत्रकात म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीतही जागावाटप आणि सत्तेच्या पदांचे समान वाटप केले जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान एका संयुक्त पत्रकार परिषदेत म्हटले होते. मात्र गेल्या काही दिवसांत शिवसेनेची भूमिका मवाळ झाली आणि वाटय़ास येतील तेवढय़ा जागा लढविण्याची मानसिक तयारी सेना नेत्यांनी सुरू केली होती.

‘शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद नाही’

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळीतून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले असताना शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याचे आश्वासन देण्यात आलेले नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी स्पष्ट केले. एकप्रकारे आदित्य यांना सरकारमध्ये महत्त्वाचे पद दिले जाणार नाही, असे भाजपने सूचित केले.