टीका करण्यासाठी भाजपाला भारतरत्न दिला पाहिजे असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत लगावला आहे. भाजपाचे अभ्यासू नेते कुठल्याही विषयावर अमर्याद टीका करु शकतात त्यामुळे त्यांना आता भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे. काही लोकांना पीएचडीची पदवी दिली पाहिजे असं म्हणत संजय राऊत यांनी टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आजपासून रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी लागू केली आहे. यावरुन भाजपाने टीका करण्यास सुरुवात केली आहे. यावर विचारलं असता संजय राऊत म्हणाले “भाजपाला टीका करण्यासंदर्भात भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे. टीका करण्यात त्यांचा हात कुणी हात धरु शकत नाही. लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे. ब्रिटनमध्ये काय चाललं आहे बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बऱ्याच महिन्यांमध्ये परदेशात गेलेले नाहीत. त्यामुळे जगात काय सुरु आहे ते कदाचित भाजपाच्या नेत्यांना माहित नसावं. केंद्र सरकारने ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवर बंदी का घातली आहे हे कारण जरा अभ्यासू नेत्यांनी तपासावं” असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.

तीन पक्ष एकत्र कधी लढतील मी वाट बघतोय आम्ही लढायला तयार आहोत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्याबद्दल संजय राऊत यांना विचारलं असता ते म्हणाले, विधानपरिषद पदवीधर निवडणुकीत आम्ही एक छोटी लढाई केली आणि ती जिंकलो. या निवडणुकीत तीन पक्ष एकत्रच होते. त्यामुळे पुढेही ते एकत्रच असतील असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोकांची काळजी घेण्यासाठी निर्णय घेत आहेत. सरकार हतबल झालं आहे ते दिल्लीत महाराष्ट्रात नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे मोदी सरकारची हतबलता दिसून येते आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. अशी हतबलता मी गेल्या ५० वर्षात पाहिलेली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बाळासाहेब सानप यांनाही टोला
बाळासाहेब सानप भाजपात गेले आहेत त्यामुळे शिवसेनेला नाशिकमध्ये नुकसान झालं आहे का? असं विचारलं असता बाळासाहेब सानप शिवसेनेत असताना काही फायदाही झाला नाही त्यामुळे नुकसान होण्याचा प्रश्नच नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.