बीडमध्ये झालेल्या स्वाभिमान रॅलीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीका केली. तसेच, घराणेशाहीच्या मुद्द्यावरून सध्या चालू असणाऱ्या टीका-टिप्पणीवरही विरोधकांकडून सातत्याने आक्रमक भूमिका घेतली जात असताना त्यावरून आता भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांनी भाष्य केलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका करताना ईडीचाही उल्लेख केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच १५ ऑगस्टनिमित्ताने लाल किल्ल्यावर आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात भाषण करताना घराणेशाहीवर टीका केली होती. भ्रष्टाचार, घराणेशाही व वितुष्टीकरण या तीन अडचणी पार केल्याशिवाय देशात विकास अशक्य आहे, असं विधान मोदींनी केलं होतं. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून भाजपामध्ये असणाऱ्या राजकीय कुटुंबांचा मुद्दा उपस्थित करत मोदींना प्रत्युत्तर दिलं होतं. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे.
“आता काय त्यांनी आम्हाला तत्वज्ञान सांगायचं?”
दरम्यान, सुधीर मुनगंटीवारांनी टीव्ही ९ शी बोलताना यासंदर्भात खोचक टिप्पणी केली आहे. यावेळी त्यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं आहे. “रात्री झोपेतही ईडी म्हटलं तर एक किलोमीट धावणारे हे लोक आहेत. आता त्यांनी आम्हाला तत्वज्ञान सांगायचं?” असा खोचक सवाल मुनगंटीवार यांनी केला आहे.
मविआमध्ये जागावाटपाचं सूत्र ठरलं? संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले, “नेत्यांनी ठरवलंय की…!”
“ज्यांनी आयुष्यात आपल्या परिवारासाठी काम केलं. ज्यांचं आयुष्य राजकारणात स्वत:च्या परिवारासाठी गेलं, त्यांनी ज्ञान द्यायचं? उलथून टाकायची भाषा त्यांनी करावी ज्यांनी आयुष्यभर जनतेच्या हितासाठी निर्णय घेतले”, अशी टीकाही सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केली.