राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गट आणि भाजपाकडून शिवसेनेवर टीका केली जात आहे. तर शिवसेनेकडूनही तेवढ्याच क्षमतेने उत्तरं दिली जात आहेत. विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेने आमच्याशी संपर्क करण्याचे टाळले, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच केला. त्याच्या या आरोपाला राऊतांनी हा खोटारडेपणाचा कळस आहे म्हणत आमच्या लाऊडस्पीकरसमोर तुमच्या पिपाण्या टिकणार नाहीत, असा उपरोधिक टोला लगावला. दरम्यान, राऊतांच्या याच वक्तव्याचा भाजपा प्रवक्ते विनोद वाघ यांनी समाचार घेतला आहे. आम्ही सक्षम आहोत, मात्र तुमची रोज वाजणारी बेसूर पिपाणी बंद करा, असा पलटवार विनोद वाघ यांनी केला आहे.

हेही वाचा >> “मी फोन करत होतो पण…” फडणवीसांनी केला आरोप; राऊत म्हणाले “हा तर हा खोटारडेपणाचा कळस”, सरकार स्थापनेवरून पुन्हा घमासान

“संजय राऊतांनी राज्य सरकार आणि भाजपाची चिंता करू नये. राज्य सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि भविष्यातही करत राहणार. त्यामुळे आमची चिंता करु नका. तुमचं उद्या काय होणार, याची तुम्ही चिंता करा. महाराष्ट्रातील जनता आमच्यासोबत आहे. आम्ही सक्षम आहोत. त्यामुळे आमची चिंता करण्याऐवजी तुम्ही तुमची चिंता करा. तुमची रोज बेसूर वाजणारी पिपाणी अगोदर बंद करा. तुमच्या या बेसूर पिपाणीला महाराष्ट्रातील जनता कंटाळली आहे. त्यामुळे तीच ती पिपाणी रोज वाजवू नका. याआधीही लोकांना हे आवडलेले नाही. भविष्यातही आवडणार नाही. त्यामुळे ही पिपाणी बंद करा,” अशी उपरोधिक टीका वाघ यांनी केली.

हेही वाचा >> मुंबईला दोन वर्षात खड्डेमुक्त करणार म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राष्ट्रवादीची विचारणा; म्हणाले “मग गेल्या अडीच वर्षात…”

संजय राऊत काय म्हणाले होते?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निवडणुकीनंतर युतीसाठी आम्ही त्यांच्याशी (शिवसेना) चर्चा करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी आमच्याशी चर्चाच केली नाही. मी फोन कॉल करत होतो. पण ते फोन घेत नव्हते. कारण त्यांचं ठरलं होतं, असे देवेंद्र फडणवीस काल (२३ जुलै) म्हणाले होते. फडणवीसांच्या याच दाव्याला उत्तर देताना “असत्याला सत्याचा मुलामा देऊन कितीही गुळगुळीत करण्याचा प्रयत्न केला तरी सत्य हे सत्य असते. त्यामुळे भंपक गोष्टीकडे लक्ष देऊ नको. आमच्या लाऊडस्पीकरसमोर तुमच्या पिपाण्या टिकणार नाहीत. मराठी माणूस आज अस्वस्थ आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला. पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न झाला. तुम्ही आम्हाला सत्य आणि न्यायाच्या गोष्टी सांगू नका,” असे संजय राऊत आज (२४ जुलै) म्हणाले.