उल्हासनगरमध्ये भाजपाला पुन्हा धक्का; नऊ बंडखोर नगरसेवकांच्या अपात्रतेची याचिका आयुक्तांनी फेटाळली

राष्ट्रवादीत गेलेल्या कलानी गटाला दिलासा मिळाला असून निवडणूक लढण्याचा नगरसेवकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

BJP Ulhasnagar disqualification petition nine rebel corporators rejected by the Konkan Divisional Commissioner

उल्हासनगर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी कलानी परिवाराच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर उल्हासनगरात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उल्हासनगरातील टीम ओमी समर्थक २२ नगरसेवकांना पक्षात प्रवेश केला होता. मात्र भाजपाने याआधी याचिकेत नऊ बंडखोर नगरसेवकांच्या पात्रता रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी नऊ बंडखोर नगरसेवकांच्या अपात्रतेची याचिका कोकण विभागीय आयुक्तांनी फेटाळली आहे. त्यामुळे उल्हासनगरमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे तसेच या नगरसेवकांच्या निवडणूक लढवण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

उल्हासनगर महापालिकेत २०१९ मध्ये झालेल्या महापौर निवडणुकीत भाजपाच्या नऊ नगरसेवकांनी शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमेदवाराला ऐनवेळी मतदान केल्याने भाजपाला महापौर पदावर पाणी सोडावे लागले होते. याविरुद्ध भाजपच्या गटनेत्यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे याविरुद्ध दाद मागितली होती. नऊ नगरसेवकांचा अपात्र करावे अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. यावर बराच काळ सुनावणी चालली. निकालाबाबत दिरंगाई होत असल्याचा आरोप करत भाजपने उच्च न्यायालयात या प्रकरणी वेळीच आणि तातडीने निकाल देण्याची मागणी केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने कोकण विभागीय आयुक्तांना ३० नोव्हेंबरपर्यंत या प्रकरणाचा निकाल लावण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी या प्रकरणी शेवटची सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर ३० नोव्हेंबर रोजी या नऊ नगरसेवकांच्या प्रकरणी दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली आहे. कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाने याबाबत कळवले असल्याची माहिती नगरसेवकांचे वकील असलेले प्रकाश कुकरेजा यांनी दिली आहे.

या नगरसेवकांमध्ये नुकत्याच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या टीम ओमी कलानीच्या सदस्यांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीतील उट्टे काढण्यासाठी या नगरसेवकांनी भाजपला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बंडखोरी करत शिवसेनेला मतदान केले होते. त्यामुळे संख्याबळ असूनही भाजपला पराभवाचा धक्का बसला. याप्रकरणी कोकण विभागीय आयुक्तांकडे दाखल करण्यात आलेल्या याचिकेत यांना नगरसेवकांना अपात्र ठरवण्याची मागणी करण्यात आली होती. भाजपच्या याचिकेवर निकाल सकारात्मक निकाल झाला असता तर या नऊ नगरसेवकांना पुढील सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यापासून निर्बंध घातले गेले असते.

राष्ट्रवादी काँग्रसेला फायदा

या नगरसेवकांमध्ये महापौर पंचम कलानी यांचाही समावेश होता. त्यामुळे एकीकडे निवडणुकीची लढाई निवडणुकीची तयारी सुरू असताना अपात्रतेची टांगती तलवार या नगरसेवकांवर होती. हा निकाल उल्हासनगर भाजपासाठी धक्का मानला जातो आहे तर उल्हासनगर महापालिका निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळ मिळण्याची शक्यता व्यक्त होते आहे.

त्याआधी उल्हासनगर महापालिकेची आगामी निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. कलानी परिवाराच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर उल्हासनगरात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. त्यामुळेच शिवसेनेने निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्याची चर्चा उल्हासनगरात आहे. उल्हासनगर शहराचे माजी आमदार पप्पू कलानी हे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर उल्हासनगर शहरातली राजकीय गणिते मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. आधी भाजपासोबत असलेल्या कलानी गटानं पप्पू कलानी हे जेलबाहेर येताच तब्बल आपल्या नगरसेवकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे उल्हासनगर महापालिकेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता येईल, अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण झाली आहे.

मात्र या सगळ्यानं महापालिकेत सध्या सत्ताधारी असलेल्या शिवसेनेसाठी असुरक्षित वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे शिवसेनेनं एक पाऊल पुढे टाकत राष्ट्रवादीला निवडणुकीपूर्वीच एकत्र येण्याचं आवाहन केले. त्याला राष्ट्रवादी, म्हणजेच कलानी परिवारानेही भविष्याचा विचार करत होकार दिला आहे.

दरम्यान, भिवंडीत सुरेश म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला भिवंडीतही बळ मिळणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp ulhasnagar disqualification petition nine rebel corporators rejected by the konkan divisional commissioner abn

ताज्या बातम्या