मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केल्यामुळे नाशिक महापालिकेत एकत्र नांदणाऱ्या मनसे व भाजप आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. राज यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शनिवारी त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. राज ठाकरे यांची काँग्रेसधार्जिणी भूमिका कायम राहिल्यास महापालिकेत एकत्र रहायचे की नाही याचाही फेरविचार केला जाईल, असा निर्वाणीचा इशाराही देण्यात आला आहे. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, वैतागलेल्या राज यांनी शुक्रवारी सायंकाळी मुंबईला परतण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. या बाबतची सूचना पोलीस यंत्रणेला दिली गेली. परंतु, नंतर पुन्हा त्यांनी थांबण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
नरेंद्र मोदी यांच्यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी साधलेले शरसंधान भाजपच्या चांगलेच जिव्हारी लागले असून त्याची परिणती उपरोक्त घटनाक्रमात झाली. राज हे सध्या नाशिक दौऱ्यावर असून शनिवारी त्यांच्या हस्ते महापालिकेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन केले जाणार आहे. परंतु, ही तारीख निश्चित करताना मनसेने केवळ आपल्या नेत्याची सोय पाहिली भाजपला विचारात घेतले नाही. सत्ता स्थापनेपासून मनसेची ही कार्यशैली असून महत्वपूर्ण निर्णय घेताना भाजपला वारंवार डावलले गेल्याचा आरोप स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला. मोदींवर शरसंधान साधून राज हे काँग्रेसधार्जिणी भूमिका निभावत आहे. पुढील काळातही त्यांची ही भूमिका कायम राहिल्यास नाशिक महापालिकेत आघाडी ठेवायची की नाही याचा विचार करावा लागणार असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. भाजपच्या आरोपांचे मनसेने मात्र खंडन केले. भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुनच शनिवारी होणाऱ्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमीपूजन कार्यक्रमांची तारीख निश्चित करण्यात आल्याचे महापौर अॅड. यतिन वाघ यांनी सांगितले. यापूर्वी भाजपच्या आग्रहानुसार दोन वेळा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचेही ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jan 2014 रोजी प्रकाशित
नाशिक पालिकेतील मनसे-भाजपमध्ये बिघाडी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केल्यामुळे नाशिक महापालिकेत एकत्र नांदणाऱ्या मनसे व भाजप आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे.

First published on: 11-01-2014 at 02:08 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp wants to snap alliance with mns in nashik civic body