राणांचा पोलीस ठाण्यात ठिय्या; पालकमंत्री पोटे यांच्याबाबत वक्तव्याने वाद
पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करणारे भाजप कार्यकर्ते आणि रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये शुक्रवारी हाणामारी झाली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी रवी राणा यांच्या कार्यालयाची तोडफोड केली, तर राणा समर्थकांनी केलेल्या दगडफेकीत भाजपचे चार कार्यकर्ते जखमी झाले आहेत.
येथील भीमटेकडी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला प्रशासनाने परवानगी नाकारली होती तरीही आमदार राणा यांनी पुतळ्याचे अनावरण केले. या वेळी बोलताना त्यांनी पालकमंत्री हे बालकमंत्री आहेत. पुतळ्याला परवानगी दिली नाही, तर पालकमंत्र्यांच्या कानाखाली वाजवू, असे वक्तव्य केले होते. रवी राणा यांनी आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी भाजप कार्यकर्त्यांची मागणी होती. काही वेळाने अचानक भाजप कार्यकर्त्यांनी रवी राणा यांच्या कार्यालयाची तोडफोड सुरू केली. रवी राणा यांच्या पोस्टरला काळे फासण्यात आले. प्रत्युत्तरात युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना विटा फेकून मारल्या, त्यानंतर हाणामारीला सुरुवात झाली.

एखाद्यावर टीका केली म्हणून त्याचे उत्तर हे गुंडगिरीने द्यायचे नसते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपण कार्यालयात उपस्थित असताना कार्यालयावर हल्ला केला. पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाला विरोध केला. ही भाजपची दडपशाही आहे.
– रवी राणा, आमदार