ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्‍याचा काळा अध्‍यादेश त्‍वरीत मागे घ्‍यावा, असे आमदार सुधीर मुगंटीवार यांनी म्हटले आहे. कोवीड-19 च्‍या प्रादुर्भावाच्‍या काळात वित्‍त आयोगाचा मोठा निधी ग्रामपंचायतींना दिला गेला, तेव्‍हा आपल्‍या कार्यकर्त्‍यांची, पदाधिका-यांची नेमणूक प्रशासक म्‍हणून तिथे व्‍हावी यासाठी हा काळा अध्‍यादेश सरकारने काढला आहे. हा अध्‍यादेश सरकारने तातडीने मागे घेण्‍याची आवश्‍यकता आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकशाहीमध्‍ये ग्राम पंचायत एक महत्‍वाची स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था आहे. महाराष्‍ट्रातील एकूण 27 हजार 782 ग्राम पंचायतींपैकी 14 हजार 314 ग्राम पंचायतींच्‍या निवडणूका 2020 मध्‍ये होवू घातल्‍या आहेत. आज कोविड-19 जागतिक महामारीच्‍या संकटात या निवडणूका घेणे शक्‍य नाही आणि योग्‍यही नाही. यासाठी महाराष्‍ट्र विधानसभेच्‍या अर्थसंकल्‍पीय अधिवेशनात जेव्‍हा शासनाने कृषी उत्‍पन्‍न बाजार समित्‍यांच्‍या निवडणुका न घेता सदर समित्‍यांचे अध्‍यक्ष व संचालक मंडळाला मुदतवाढ दिली. जिल्‍हा मध्‍यवर्ती बँका, पतसंस्‍था व सहकार क्षेत्रातील ज्‍या संस्‍थांचा 5 वर्षाचा कालावधी संपल्‍यामुळे तेथील पदाधिका-यांना मुदतवाढ देण्‍यासाठी त्‍या कायद्याच्‍या अनुषंगाने विधेयक मंजूर केले व मुदतवाढ देण्‍यासंदर्भात निर्णय केला. जो निर्णय शासनाने सहकारी संस्‍थांसाठी केला, मध्‍यवर्ती बँकांसाठी केला, कृषी उत्‍पन्‍न बाजार समित्‍यांसाठी केला तो निर्णय ग्राम पंचायतींसंदर्भात लागू करणे गरजेचे होते. मात्र, निवडणूक होवू घातलेल्‍या 14 हजार 314 ग्राम पंचायतींवर आपल्‍या पक्षाच्‍या पदाधिका-यांना व कार्यकर्त्‍यांना प्रशासक म्‍हणून नेमता येईल अशी सोय केली, अध्‍यादेश काढला गेला, असे मुनगंटीवार म्हणाले.

तसेच, यासंदर्भामध्‍ये विधी व न्‍याय विभागाने सरकारला जाणीव करून दिली होती की अशा पध्‍दतीने त्रयस्‍थ व्‍यक्‍तीला ग्राम पंचायतीच्‍या सरपंच पदाची सुत्रे आणि कार्यभार सोपविणे योग्‍य होणार नाही, ही लोकशाहीची थट्टा आहे. सर्व सरपंच मग तो कोणत्‍याही पक्षाच्‍या विचारांचा असो त्‍यांना माझी विनंती आहे, की आम्‍ही उच्‍च न्‍यायालयाच्‍या नागपूर खंडपीठाकडे या निर्णयाविरोधात याचिका दाखल करीत आहोत, आपणही यामध्‍ये आपल्‍या ग्रामपंचायतीची माहिती तातडीने द्यावी. मी महाराष्‍ट्रातील सर्व विधानसभा सदस्‍यांना आग्रहाची विनंती करीत आह की त्‍यांनी हा काळा अध्‍यादेश मागे घेण्‍याची मागणी राज्‍य सरकारला करावी व लोकशाहीच्‍या मुल्‍यांचे रक्षण करावे असेही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी आवाहन केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Black ordinance to appoint administrators on gram panchayats should be withdrawn immediately mungantiwar msr
First published on: 16-07-2020 at 16:27 IST