सांगली : विट्याजवळील रेवणगाव, घोटी परिसरात पहिल्यांदाच काळा बिबट्याचे (ब्लॅक लेपर्ड) वास्तव्य समोर आले असून, वन विभागाच्या पडताळणीमध्ये दुष्काळी भागात काळा बिबट्या आढळल्याचे सिद्ध झाल्याचे वनक्षेत्रपाल विलास पालवे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना शुक्रवारी सांगितले. काळा बिबट्याचे जिल्ह्यात प्रथमच दर्शन घडले आहे. यापूर्वी सातारा जिल्ह्यात तो दिसल्याची नोंद झालेली आहे.
ताकारी योजनेचे पाणी उपलब्ध झाल्याने कडेगाव, पलूस, विटा शहराच्या परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याशिवाय सागरेश्वर अभयारण्यातील हरणांची संख्या वाढत आहे. ही हरणे चारा-पाण्याच्या शोधात बागायती क्षेत्रात शिरली आहेत. यामुळे यावर गुजरान करणारे बिबट प्राण्यांचेही वास्तव्य या परिसरात अलीकडच्या काळात वाढत आहे.
शिराळा, वाळवा तालुक्यात तर बिबट्यांचे वास्तव्य सहज नजरेस पडण्याइतपत वाढले आहे. मात्र, या तुलनेत कमी बागायती क्षेत्र असतानाही कडेगाव, विटा परिसरातही बिबट्यांचा आढळ होत आहे. बिबट प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास आता उसाचे वाढते क्षेत्र हेच बनले असून, नवीन पिढीने या परिस्थितीशी जुळवून घेतले आहे. मानवी वस्तीवरील भटके व पाळीव श्वान, शेळ्या, मेंढ्यासारखी लहान जनावरे हेच यांचे खाद्य असल्याने मानवी वस्तीजवळ या प्राण्याचे अस्तित्व वारंवार आढळत आहे.
यातच गेल्या दोन दिवसांपासून रेवणगाव, पारे, घोटी बुद्रुक परिसरात काही नागरिकांना ब्लॅक पँथरचे म्हणजेच काळ्या बिबट्याचे दर्शन झाले. या प्राण्याचे चलचित्रीकरणही करण्यात आले असून, समाज माध्यमांवर ही चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी यांनी या परिसरात पडताळणी केली असता काळा बिबट्याचा आढळ या परिसरात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
घोटी येथील सरपंचांनीही काळ्या बिबट्या श्वान पकडण्यासाठी आल्याचे आणि त्याच्या पाउलखुणाही पाहण्यास मिळाल्या असल्याचे वन विभागाला कळविले असून, त्याचीही पडताळणी करण्यात आली असता या प्राण्याच्या वास्तव्याला दुजोरा मिळत असल्याचे वनक्षेत्रपाल श्री. पावले यांनी सांगितले.
काळा बिबट हा आपली शिकार रात्री करत असून, मानवाच्या वाटेला सहसा जात नाही. तरीही शेतात काम करत असताना सावधानता बाळगावी, त्याला इजा करण्याचा अथवा हुसकावून लावण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे. त्याचे खाद्य हे प्रामुख्याने भटके श्वान असून, तो खाद्याच्या शोधार्थ रात्री बाहेर पडत असल्याने मानवाला याच्यापासून सध्या तरी धोका नाही. मात्र, सावधानताही महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या विटा परिसरात काळा बिबट आढळणे हे संपन्न नैसर्गिक परिसंस्था असल्याचे सिद्ध होत असून, याचे रक्षण सर्वांनीच करणे गरजेचे आहे, असे मत वनक्षेत्रपाल विलास पावले यांनी व्यक्त केले.