व्यापक कारवाई सुरु करूनही रास्त भाव दुकानदारांकडून धान्याचा काळाबाजार थांबण्याची चिन्ह दिसत नाही. दिघोडी पाठोपाठ अलिबाग शहरातही रास्त भाव दुकानात धान्याचा काळाबाजार सुरु असल्याचे समोर आले आहे. अलिबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलिबाग तालुक्यातील दिघोडी येथे धान्याचा काळाबाजार करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर धान्य वितरणातील गैरप्रकार थांबतील अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. अलिबाग शहरातील मध्यवर्ती भागात रास्त भाव दुकानात धान्याचा काळाबाजार सुरु असल्याची बाब समोर आली. यानंतर पोलीस आणि पुरवठा विभागाने धाडी टाकून संबधितांवर कारवाई केली.
आणखी वाचा- लॉकडाउनचा फटका, बीडमधील शेतकऱ्यानं तीन एकरातील झेंडू उपटून फेकला
याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ३ आणि ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहूल जगे आणि विलास जगे अशी आरोपींची नावे आहेत. शासनाकडून प्राप्त झालेले धान्य दोघे संगनमत करून शिधापत्रिका नसलेल्या ग्राहकांना विकत होते. अलिबाग पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. दोन दिवसांत जिल्ह्यात झालेली ही दुसरी मोठी कारवाई आहे.