रक्तपेढय़ांसमोरील अडचणी मात्र कायम

राज्यातील रक्तपेढय़ांमधील शिल्लक रक्त अन्य रक्तपेढय़ांना हस्तांतरित करण्यासाठी परवानगी देण्यात आली असली, तरी रक्त वाहून नेण्याची सुविधा, तपासणी शुल्क आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे अनेक रक्तपेढय़ा अतिरिक्त रक्तसाठा इतरांना देऊ शकत नाहीत, असे चित्र आहे.

आरोग्य विभागाने रक्तपेढय़ांमधील जादा रक्तसाठा एकाचवेळी अन्य परवानाधारक रक्तपेढय़ांना हस्तांतरित करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी परवानगी दिली होती. यासाठी काही नियम देखील ठरवण्यात आले आहेत. अनेकवेळा अतिरिक्त रक्त संकलित झाल्यानंतर ते कालबाह्य होऊन फेकावे लागते. दुसरीकडे, अनेक ठिकाणी रक्ताची कमतरता जाणवते, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी एका रक्तपेढीतून दुसऱ्या रक्तपेढीत रक्त सहजरीत्या हस्तांतरित करण्यासंदर्भात मागणी होऊ लागली होती. अखेर  आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ‘नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन’ने रक्तसाठय़ाच्या हस्तांतरणाला परवानगी दिली. यानुसार सरकारी आणि खासगी रक्तपेढय़ा एकमेकांना रक्ताचा पुरवठा करू शकतील. जर, अन्य राज्यांमधील रक्तपेढय़ांना हा रक्तसाठा द्यायचा असेल, तर दोन्ही राज्यांच्या राज्य रक्त संक्रमण परिषदेला त्याविषयी माहिती देणे बंधनकारक आहे. रक्ताच्या घटकांचेही हस्तांतरण रक्तपेढय़ांना करता येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्यात ३१७ रक्तपढय़ा  सध्या कार्यरत आहेत. दरवर्षी सुमारे १५ लाख युनिट रक्त संकलन केले जाते. सुरक्षित रक्ताचा आणि त्याच्या घटकांचा पुरवठा वाजवी दरात करणे हे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे उद्दिष्ट आहे. राज्यात २००० पासून सिकलसेलग्रस्त बालके तसेच थॅलेसेमिया आणि हेमोफिलियाने पीडित रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. राज्यात रक्तसंकलनात वाढ होत आहे. २०११ मध्ये २८२ रक्तपेरढय़ा होत्या आणि १३.४४ लाख युनिट रक्ताचे संकलन झाले होते. आता रक्तपेढय़ांची संख्याही वाढली आहे. मात्र, रक्तांच्या हस्तांतरणातील अडचणी दूर झालेल्या नाहीत, त्यामुळे गरजूंना वेळेवर रक्त मिळणे कठीण होऊन बसले आहे. रक्त संकलनादरम्यान रक्ताची तपासणी करण्यात येते. त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री प्रत्येक रक्तपेढय़ांकडे आहे, पण यंत्रसामुग्रीच्या अद्ययावततेनुसार तपासणी शुल्क वेगवेगळे आहे. रक्तांची तपासणी झाल्यानंतर तो रक्तसाठा जर अन्य रक्तपेढीत हलवायचा असेल, तर ते शुल्क देण्याची तयारी त्या रक्तपेढीने दर्शवली पाहिजे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे, रक्तसाठा वाहून नेण्यासाठी शीतपेटय़ांची व्यवस्था असलेले वाहन आवश्यक आहे. राज्यातील अनेक रक्तपेढय़ांकडे अशा प्रकारची सुविधा असलेले वाहन नाही. त्यामुळे रक्त हस्तांतरित करण्याच्या मार्गातील समस्या अजूनही दूर झालेल्या नाहीत. रक्तपेढय़ांना जर सुविधा उपलब्ध करून दिल्या, तर अतिरिक्त रक्तसाठा हस्तांतरित करण्यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत. मात्र, अजूनही सुविधांचा वाणवा आहे. ‘कोल्ड चेन’ वाढवण्यासाठी गरज आहे. सरकारने रक्तपेढय़ांना रक्तसाठा हस्तांतरित करण्यासाठी परवानगी दिली असली, तरी अजूनही अंमलबजावणीच्या पातळीवर संथपणा आहे, असे संत गाडगेबाबा रक्तपेढी व कंपोनंट सेंटरचे सोपान गोडबोले यांनी सांगितले. रक्त वाया गेल्यापेक्षा ते अन्य रक्तपेढय़ांमध्ये हस्तांतरित करण्यासाठी परवानगी देण्यात आल्याने गरजूंपर्यंत अधिकाधिक रक्त पोहचू शकेल, असे अमरावती रक्तदान समितीचे अध्यक्ष महेंद्र भुतडा यांनी सांगितले.