‘ब्ल्यू व्हेल’ नावाच्या संगणकीय खेळाच्या नादातून घराबाहेर पडून आत्महत्येचा विचार करीत भिगवणपर्यंत गेलेल्या सोलापुरातील एका शाळकरी मुलाचे उदाहरण जिवंत असतानाच एका तरुणीने राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी टाकून आत्महत्या केल्यामुळे हा ‘ब्ल्यू व्हेल’ खेळाचाच बळी असल्याचा संशय बळावला आहे. शहरातील होटगी रस्त्यावर आसरा रेल्वे पुलाजवळ चंदनगिरात हा प्रकार घडल्यानंतर तेथील नागरिक हादरले आहेत. ‘ब्ल्यू व्हेल’च्या खेळातून आत्महत्या करण्याची ही सोलापुरातील दुसरी घटना असल्याचे बोलले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केतकी केदारलिंग हिरेमठ (वय २२) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. काल सोमवारी रात्री सव्वानऊच्या सुमनारास तिने रेणुका रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये राहत्या घराच्या तितऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली होती. तिला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार सुरू असताना थोडय़ाच वेळात तिचा मृत्यू झाला. विजापूर नाका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून झाली आहे.

केतकी हिला स्मार्टफोनवर विविध खेळ खेळण्याचा छंद होता. अलीकडे ती तासन् तास रात्री-अपरात्री स्मार्टफोनवर खेळ खेळत बसायची. रात्री ती अचानकपणे अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर गेली आणि काही वेळातच तिने खाली झोकून दिले. ‘ब्ल्यू व्हेल’ खेळाचाच हा बळी असल्याच्या संशयाला पोलीस अधिकाऱ्यांनी पुष्टी दिली आहे. केतकी हिचे शिक्षण व तिची कौटुंबिक पाश्र्वभूमी समजू शकली नाही.

गेल्या आठवडय़ात ब्ल्यू व्हेल खेळाचा अखेरचा टप्पा पार करून शहरातील एका वीस वर्षांच्या तरुणीने विजापूर रस्त्यावर टाकळी येथे भीमा नदीत उडी मारून आत्महत्या केली होती. सोलापुरात ब्ल्यू व्हेल खेळाचा शिरकाव झाला असून विशेषत: एकमेकांशी संवाद हरवून बसलेल्या ‘मुक्या’ घरातील एकलकोंडे मुले-मुली या जीवघेण्या खेळाला बळी पडत आहेत. त्यामुळे पालकवर्ग चांगलाच धास्तावला आहे.

गेल्या महिन्यात जुळे सोलापुरातील एका नामांकित शाळेत शिक्षण घेणााऱ्या एका मुलाने ‘ब्ल्यू व्हेल’च्या खेळात शेवटचा टप्पा गाठत आत्महत्येचा विचार करीत, घरातून पलायन केले होते. शोध घेतला असता तो भिगवण येथे सापडला होता. त्या वेळी त्याच्या पिशवीत जाड दोरी, चाकू, कर्कटक इत्यादी वस्तू सापडल्या होत्या. त्याच्या वर्गातील इतर सहा-सात विद्यार्थीही ‘ब्ल्यू व्हेल’ खेळाच्या विळख्यात सापडल्याची बाबही उजेडात आली होती.

अलीकडे मुंबईत ब्ल्यू व्हेल खेळाने एका मुलाचा बळी घेतल्यानंतर त्या संबंधीची वृत्ते प्रसार माध्यमातून सर्वदूर प्रसारित झाली. परंतु या जीवघेण्या खेळाचे लोण आता सोलापुरातही पोहोचल्यामुळे हा चिंतेचा विषय बनला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blue wheel game suicide solapur crime
First published on: 23-08-2017 at 03:02 IST