कराड : शहरातील मतदार याद्यांमधील परगाव, परजिल्हा, तसेच शहरातील इतर पेठांतील मतदारांची नावे समाविष्ट झाल्याचे समोर आले आहे. याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी भाजपचे माजी शहराध्यक्ष, माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर, सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी केली आहे.

याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांना देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, कराड शहरात चुकीच्या भागात नोंद झालेली नावे संबंधित यादीतून वगळून योग्य ठिकाणी नोंदवली जावीत, की जेणेकरून त्या- त्या मतदारांचा मतदानाचा हक्क अबाधित राहील. काही स्थलांतरित मतदारांची, दुबार नोंदींची, तसेच मयत मतदारांची नावे अद्याप सुद्धा मतदार यादीत असल्याचेही घनश्याम पेंढारकर व दीपक पाटील यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

मतदानाच्या ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेत तपासणी यादी (चेकलिस्ट) तपासूनच अर्जदारांची नावे अंतिम यादीत समाविष्ट करावीत. बाहेरील, अन्य ठिकाणची मतदारांची नावे अजूनही समाविष्ट होत आहेत. दिनांक ३० ऑक्टोबर २००६ पूर्वी जन्म झालेल्या व्यक्तींची नावे मतदार यादीत नोंद होत असली तरी, दिनांक १ नोव्हेंबर २००६ नंतर जन्म झालेल्या व्यक्तींची नावे आणि वय १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांची नावे अद्याप यादीत समाविष्ट होत नाहीत. प्रशासनाने या त्रुटींवर तातडीने उपाययोजना करून दुरुस्त्या कराव्यात, अशी मागणी घनश्याम पेंढारकर, दीपक पाटील आणि त्यांच्या अन्य सहकार्‍यांकडून निवेदनात करण्यात आली आहे.

दरम्यान, कराड दक्षिण मतदार संघात दुबार मतदार, बोगस मतदान हे मुद्दे सध्या गाजत आहेत. कराड शेजारील कपिल व गोळेश्वरमध्ये दुबार व बोगस मतदार सापडले असून, कपिल गावात वास्तव्यास आणि कपिल गावाशी कोणताही संबंध नसणार्‍या सात जणांची नावे उघड करीत कपिल गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश पवार यांनी कराड तहसीलदार कचेरीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्याला विविध पक्ष, संघटनांचा पाठिंबा मिळत असून, या गंभीर प्रश्नी येत्या मंगळवारी ( दि.१७ ) सर्वपक्षीय व्यापक आंदोलन करून कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे व वरीष्ठ महसूल अधिकारी, निवडणूक आयोग व राज्य तसेच केंद्र सरकारमधील मंत्री, लोकप्रतिनिधी यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे काँग्रेसच्या इतर मागास संघटनेचे (ओबीसी) महाराष्ट्र राज्य प्रादेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी जाहीर केले आहे. भानुदास माळी यांनी आज रविवारी आपल्या सहकारी कार्यकर्त्यां समवेत उपोषणस्थळी येवून बोगस मतदान प्रश्नी बेमुदत उपोषणास बसलेल्या गणेश पवार यांना पाठिंबा देताना, मंगळवारी इथे सर्वपक्षीय व्यापक आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे.