सावंतवाडी : गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या ओंकार हत्तीवर सुतळी बॉम्ब फेकल्याची घटना समोर आली आहे. समाजमाध्यमावर या संदर्भातील एक चित्रफीत प्रसारित झाली आहे. काही दिवसांपूर्वी त्याला बांबूने मारहाण केल्याचा प्रकारही घडला होता. वारंवार घडणाऱ्या या घटनांबाबत प्राणीमित्र संघटनांकडून संताप व्यक्त केला जात आहे. गेला दीड महिना कळपापासून दुरावलेला ओंकार हत्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सीमावर्ती भागात तळ ठोकून आहे. अन्न आणि पाण्याच्या शोधात तो बागायतींचे नुकसान करतो, तर कधी महामार्गावर येऊन वाहतूक अडवून धरतो. सुरुवातीला आक्रमक असलेला हा हत्ती आता माणसाळल्याचे बोलले जात आहे. तरीही स्थानिकांमध्ये त्याची दहशत कायम आहे. बांदा येथील तेरेखोल-तुळसाण नदीपात्रात डुबकी घेत असताना ओंकारवर सुतळी बॉम्ब फेकल्याचे प्रकार समोर आले आहेत. समाजमाध्यमावरील चित्रफितीत या हत्तीवर चार ते पाच सुतळी बॉम्ब फेकण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून ओंकार हत्तीवरील हल्ल्याचे प्रकार समाजमाध्यमातून प्रसारित झाले आहेत. हे प्रकार तातडीने थांबवून ओंकार हत्तीला सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी केली जात आहे.
न्यायालयाच्या परवानगीनंतरच पकड मोहीम
मार्ले येथील शेतकऱ्यावर हल्ला करून त्याला ठार मारल्यानंतर वन विभागाने ‘ओंकार’ हत्तीला पकडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र याविरोधात काही पर्यावरणवादी संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि मोहीम सध्या थांबविण्यात आली आहे. न्यायालयाची परवानगी घेण्यासाठी वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर केला जाईल. न्यायालयाच्या परवानगीनंतरच हत्ती पकडण्याची मोहीम सुरू केली जाईल, अशी माहिती वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हत्तीला त्रास देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची माहिती गोळा केली जात आहे. सर्व संबंधितांवर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल.
- मिलीश शर्मा, उपवनसंरक्षक सिंधुदुर्ग.
हत्ती समूहात राहणारा प्राणी आहे. ओंकार हत्तीला समूहात सोडावे म्हणून मी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते. त्याच्यावर सुतळी बॉम्ब फेकण्याचा प्रकार चुकीचा आहे. ओंकार हत्ती लहान असून, तो भरकटलेल्या स्थितीत फिरतोय. त्याचे कुटुंब असेल त्या समूहात वन विभागाने त्याला सोडून देणे आवश्यक आहे.
- स्टॅलिन दयानंद, संचालक, वनशक्ती संस्था
कायदेशीर कारवाई
बागायतदारांनी नदीपात्रात पाण्याचे पंप बसवले होते. हत्ती तिकडे जाऊन नुकसान होऊ नये यासाठी त्याच्यावर सुतळी बॉम्ब फेकण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वन विभागानेही या वृत्ताला दुजोरा दिला असून, हत्तीला त्रास देणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे.
