शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या सुशोभीकरणाच्या कामाला तातडीने चालना देण्यात येणार असल्याची माहिती खासदार दिलीप गांधी यांनी दिली. देशाच्या संरक्षणमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारताच अरुण जेटली यांच्याशी याबाबत चर्चाही झाल्याची माहिती त्यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या शपथविधीनंतर मंगळवारी रात्री उशिरा गांधी नगरले परतले. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे, की देशाच्या संरक्षणमंत्रिपदाची सूत्रे जेटली यांनी नुकतीच स्वीकारली. त्यानंतर लगेचच दिल्लीत त्यांची भेट घेऊन याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून किल्ल्याच्या सुशोभीकरणाचे काम रेंगाळले असून, झालेली कामेही त्यामुळे पुन्हा खराब होऊ लागली आहेत. याबाबत याआधीही संरक्षण खात्याशी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. तत्कालीन संरक्षण राज्यमंत्री पल्लम राजू यांच्या उपस्थितीत त्याची बैठकही झाली होती. या बैठकीत याबाबत संरक्षण खाते व राज्य सरकार यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याचे ठरले होते, मात्र पुढे हे काम रेंगाळले. मात्र आता त्याला तातडीने गती देण्यात येणार असून त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही जेटली यांनी पहिल्याच चर्चेत दिल्या आहेत.
पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत असलेल्या दमाजी मस्जिद, चंगेझखान महालाजवळील मकबरा, नियामतखान महालाजवळील दरवाजा, बारा इमाम कोटला, निजाम अहमदशाह मकबरा, फऱ्याबाग आदी वास्तूंच्या नूतनीकरणासाठीही भारत पेट्रोलियमच्या सीआरआर फंडातून २ कोटी रुपयांचे प्रस्तावल पाठवण्यात आले आहेत. त्यास तत्त्वत: मान्यताही मिळाली आहे, मात्र आचारसंहितेमुळे पुढची प्रक्रिया लांबली. आता मात्र त्यालाही गती मिळेल असा विश्वास गांधी यांनी व्यक्त केला.