बांधकाम पूर्ण झाल्याचा दाखला देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारणा-या गगनबावडा पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शरद श्रीपाद (रा.गगनबावडा) पाटील यास बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. याबाबत युवराज मारूती वर्धन (रा.खेरीवडे, ता.गगनबावडा) यांनी तक्रार दाखल केली होती.    
वर्धन यांनी खेरीवडे गावामध्ये दलित वस्तीमध्ये समाज मंदिर बांधण्याचा ठेका घेतला होता. २ लाख ७ हजार रुपये खर्चाच्या बांधकामास मंजुरी मिळाली होती. बांधकाम चालू असताना वर्धन यांना आत्तापर्यंत ग्रामपंचायतीने १ लाख ४२ हजार रुपये धनादेशाव्दारे दिले आहेत. समाज मंदिराचे बांधकाम त्यांनी आठ महिन्यांपूर्वी पूर्ण केले आहे. त्यासाठी उर्वरित ६५ हजार २९० रुपयांची रक्कम मिळावी यासाठी ते खेरीवडेमधील ग्रामसेवकांना भेटले होते. ग्रामसेवकाने अंतिम बिल काढण्यासाठी पंचायत समिती गगनबावडय़ाचे बांधकाम विभागाचे अभियंता शरद पाटील यांच्याकडून काम पूर्ण झाल्याचा दाखला (एम.बी.) घेऊन येण्यास सांगितले होते.     
वर्धन यांनी अभियंता पाटील यांची भेट घेऊन दाखला मिळण्याची मागणी केली. यावेळी पाटील यांनी दोन हजार रुपये लाचेची मागणी वर्धन यांच्याकडे केली. वर्धन यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पाटील यांच्या विरुध्द आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता पाटील याने वर्धन यांना लाचेची रक्कम घेऊन महालक्ष्मी मंदिराजवळील माऊली लॉज येथे येण्यास सांगितले. तेथील रूम नं.२०३ मध्ये वर्धन यांच्याकडून दोन हजार रुपयांची लाच रक्कम पंचसाक्षीदारा समक्ष स्वीकारत असताना अभियंता पाटील याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक उदय आफळे, पोलीस उपअधीक्षिका पद्मा कदम, पोलीस निरीक्षक वैशाली घोरपडे यांच्या पथकाने केली.