परभणी : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाच्या पुढील हप्त्याच्या संचिका मंजुरीसाठी पंचासमक्ष लाच स्विकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ग्रामविकास अधिकाऱ्यास ताब्यात घेतले आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, परभणी तालुक्यातील किन्होळा ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी आम्रपाली लक्ष्मणराव काकडे यांनी तक्रारदार व त्यांच्या आई यांच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाच्या पुढील हप्त्यापोटी प्रत्येकी पाच हजार रुपयांची अशी एकूण दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
दरम्यान तडजोडीअंती प्रत्येकी चार हजार रुपये याप्रमाणे एकूण आठ हजार रुपयांच्या लाचेची पंचासमक्ष लाच स्विकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपी ग्रामविकास अधिकारी आम्रपाली लक्ष्मणराव काकडे यांना कारेगाव रस्ता परभणी येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. दरम्यान आरोपीच्या अंगझडतीत मोबाईल फोन ताब्यात घेण्यात आला असून आरोपीची घराझडती सुरू आहे. लाच स्विकारल्याप्रकरणी नवा मोंढा पोलिसांत भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.